कॉसमॉस बँक प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘पुलं स्मृती सन्मान’ जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अभिनेता स्वप्नील बांदोडकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांना तरुणाई सन्मान तर, मुक्तांगण व्यनसमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रास ‘पुलोत्सव कृतज्ञता सन्मान’ जाहीर झाला आहे. प्रत्येकी ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
औंध येथील भीमसेन जोशी नाटय़गृह येथे गुरुवारी (१७ डिसेंबर) ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता पुलोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पुलंनी लिहिलेल्या लेखांवर आधारित सांगीतिक अभिवाचनाचा आविष्कार असलेला ‘गुण गाईन आवडी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये पं. विजय कोपरकर, चंद्रकांत काळे, रेवा नातू, सुप्रिया चित्राव आणि निखिल फाटक यांचा सहभाग आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी सोमवारी दिली.
पं. मधुसूदन कानेटकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणारी मैफल शुक्रवारी (१८ डिसेंबर) एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणार असून यामध्ये मधुवंती देव, निनाद देव, वर्षां सोहोनी, राजेंद्र मणेरकर यांचा सहभाग आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कृतज्ञता सन्मान प्रदान केला जाणार असून डॉ. अनिल अवचट आणि मुक्ता पुणतांबेकर यांच्याशी प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर संवाद साधणार आहेत. श्याम मनोहर लिखित ‘काही मी’ हा विशेष नाटय़ाविष्कार रात्री आठ वाजता होणार आहे. प्रमोद काळे दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती महाराष्ट कल्चरल सेंटरची आहे.
न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या फरशीच्या मैदानावर शनिवारी (१९ डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना पुलं स्मृती सन्मान प्रदान केला जाणार असून त्यानंतर प्रभावळकर यांची मुलाखत होणार आहे. रात्री आठ वाजता डॉ. बाबा आमटे यांच्या साहित्यावर आधारित ‘करुणोपनिषदे’ हा कार्यक्रम सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, चंद्रकांत काळे, अंजली मराठे सादर करणार आहेत. रविवारी (२० डिसेंबर) पुलोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार केला जाणार असून स्वप्नील बांदोडकर आणि मृण्मयी देशपांडे यांना पुलं तरुणाई सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. बालगंधर्व ते पं. भीमसेन जोशी हा ‘स्वर अमृताचे’ कार्यक्रम प्रसिद्ध गायक आनंद भाटे सादर करणार आहेत.
लघुपट महोत्सव
‘पुलोत्सवा’मध्ये शनिवारपासून (१९ डिसेंबर) दोन दिवस राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे लघुपट महोत्सव होणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि समीक्षक अशोक राणे यांच्या उपस्थितीत सकाळी लघुपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी राणे यांच्या ‘मोंताज’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ‘पथेर पांचाली’च्या ६० वर्षांनिमित्त सत्यजित रे यांच्या चित्रपटातील ‘अपू’ या व्यक्तिरेखेचा वेध घेणाऱ्या ‘बीईंग विथ अपू’ या लघुपटाने प्रारंभ होणार आहे. महोत्सवात ‘द होम’, ‘टॅक्सी टेल्स’, ‘द ब्लॅक शीप’, ‘वॉटरमेलन’, ‘सडक छाप’ आणि ‘इन पोएटिक व्ह्य़ूज’ हे लघुपट पाहता येणार आहेत.
दिलीप प्रभावळकर यांना ‘पुलं स्मृती सन्मान’
कॉसमॉस बँक प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्यातर्फे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘पुलं स्मृती सन्मान’ जाहीर झाला आहे
First published on: 15-12-2015 at 03:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilip prabhavalkar honor memory p l deshpande