पंजाबी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर गायक, अभिनेता दिलजीत दोसांजने ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या माध्यमातून दिलजीतने प्रेक्षकांनी मनं जिंकली. या चित्रपटाच्या यशानंतर त्याच्या वाट्याला हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित ‘सूरमा’ हा चित्रपट आला. या चित्रपटानेही दिलजीतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. विशेष म्हणजे त्याच्या याच लोकप्रियतेमुळे दिल्लीतील मादाम तुसाँ या प्रसिद्ध म्युझियममध्ये त्याचा मेणाचा पुतळा बनविण्यात आला आहे. नुकतंच दिलजीतच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं.

दिलजीतने ट्विटरवर या सोहळ्याचे काही क्षणचित्रे शेअर केली आहेत. ”पंजाबमधील एका लहानशा गावातून प्रवासाला सुरुवात केलेल्या एका दोसांजने मादाम तुसाँपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. ‘पुत्त जट्ट दा’ या गाण्यावर आधारित हा पुतळा आहे”,असं कॅप्शन दिलजीतने या पोस्टला दिलं आहे.

मादाम तुसाँमध्ये असलेल्या दिलजीतच्या पुतळ्यावर काळ्या रंगाची पगडी आणि काळी टक्सिडो परिधान करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मादाम तुसाँमध्ये स्थान मिळविणारा दिलजीत पहिला शीख व्यक्ती आहे.

दरम्यान, पंजाबी गायक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या दिलजीतचा बॉलिवूडमधील वावरही वाढला आहे. दिलजीत ‘उडता पंजाब’, ‘सूरमा’, ‘फिल्लौरी’ आणि ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकला आहे. त्यासोबतच ‘जट्ट अॅण्ड ज्युलिएट सीरिज’, ‘सुपर सिंह’, ‘डिस्को सिंह’ आणि ‘पंजाब १९८४’ या चित्रपटांमध्येही झळकला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांनंतर त्याचे ‘अर्जुन पटियाला’ आणि ‘गुड न्यूज’ हे चित्रपट भेटायला येणार असून ‘गूड न्यूज’मध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि करिना कपूर स्क्रीन शेअर करणार आहेत.

 

Story img Loader