संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित शाहरूख खानच्या ‘दिलवाले’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाले तरीही कायम होता. जास्तीत जास्त चित्रपटगृहे मिळवण्यासाठी दोन्ही निर्मात्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र या प्रयत्नांमध्ये नेहमीप्रमाणे उत्तम उद्योजक अशी ओळख असलेल्या शाहरूख खानने बाजी मारली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘दिलवाले’ या चित्रपटाने देशभरात आघाडी घेतली असून त्या तुलनेत कमी चित्रपटगृहे मिळालेल्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटालाही चांगलीच गर्दी असली तरी शोजची संख्या कमी असल्याचा फटका बसला आहे.
‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही चित्रपटांना शहर आणि उपनगरातील चित्रपटगृहांमध्ये चांगलेच बुकिंग मिळाले होते. प्रेक्षकांना दोन्ही चित्रपट पहायचे असल्याने दोन्हीच्या शोजना तितकीच गर्दी असल्याचे मत चित्रपटगृहमालकांनी व्यक्त केले आहे. मात्र शाहरूख खानचा ‘दिलवाले’ हा मल्टिप्लेक्समध्ये सगळीकडे लागला असून एकपडदा चित्रपटगृहांनीही या चित्रपटाला अर्धे शोज दिले असल्याने साहजिकच या चित्रपटाचे पारडे जड झाले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची कमाई २१ ते २२ कोटी रुपये असेल. तर ‘बाजीराव मस्तानी’ला ३० टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती, त्याची कमाई १० ते १२ कोटी रुपयांच्या आसपास असेल, असे मत विश्लेषक गिरीश वानखेडे यांनी व्यक्त केले.

Story img Loader