गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वात अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची चर्चा रंगली आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला. तनुश्रीने केलेल्या आरोपानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी तनुश्रीला पाठिंबा दिला. या सर्वातच आता अभिनेत्री डिंपल कपाडियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास आठ वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत डिंपलने नानांविषयी बरंच काही सांगितलं होतं. नानांच्या स्वभावाची नकारात्मक बाजू आपण पाहिल्याचं तिने या मुलाखतीत सांगितलं.

नाना आणि डिंपलने ‘क्रांतीवीर’, ‘अंगार’, ‘अंकुश’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. त्यामुळे सेटवरील नानांचे वर्तन कसं असतं याविषयी ती व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. ‘नानांविषयी सांगायचं झालं तर ते थोडेसे निराळ्या स्वभावाचे आहेत. सेटवरही ते फार कमी लोकांशी मैत्री करतात. इतकंच नाही तर त्यांच्या स्वभावात काही वाईट गोष्टीही आहेत. पण त्यांचा अभिनय, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांची हुशारी यामुळे त्यांच्या या वाईट सवयी झाकल्या जातात’, असं डिंपल म्हणाली.

पुढे ती असंही म्हणाली, ‘त्यांचं अभिनय कौशल्य अफाट आहे. त्यामुळे त्यांच्या अभिनयापुढे साऱ्या चुका पोटात घेतल्या जातात. नानांसोबत मी काही चित्रपट केले आहेत. यावेळी मला त्रास होईल असं ते कधी वागले नाहीत. त्यामुळे आमची मैत्री चांगली होती. पण हा त्यांच्या स्वभावाची वाईट बाजूसुद्धा मी पाहिली आहे’.

तनुश्री – नानाच्या वादात डिंपल कपाडियाचा काही संबंध नाही. पण एकंदरीत नानांच्या स्वभावाविषयी ती बोलत असल्याने हा आठ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान तनुश्रीने केलेले सर्व आरोप खोटे असून लवकरच तिला कायदेशीरित्या उत्तर देईन असं नानांनी म्हटलं आहे. सध्या नाना जैसलमेरमध्ये ‘हाऊसफुल ४’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत.

Story img Loader