ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेता आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे आलोक नाथ यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. मात्र या अटकेपासून बचाव करण्यासाठी आलोक नाथ यांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

विनता नंदा यांनी केलेले आरोप खोटे असून त्यात काही तथ्य नसल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी नंदा यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावाही न्यायालयात दाखल केला आहे. परंतु याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान, ‘तारा’ मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आलोक नाथ यांनी घरी सोडण्याचं निमित्त करत माझ्यावर बलात्कार केला. या धक्क्यातून सावरणं फार कठीण होतं. परंतु आजच्या मुलींना आवाज उठविणं गरजेचं आहे, असं म्हणत विनता नंदा यांनी सोशल मीडियावर आवाज उठविल्याचं पाहायला मिळालं.

Story img Loader