हिंदी चित्रपटात कथानकाच्या बाबतीत प्रयोग करण्यापेक्षा प्रचलित ठोकताळय़ांचा आधार घेत गोष्ट रचण्यावर अधिक भर दिला जातो. वास्तव घटनांवर आधारित कथानक असेल तर त्यातून नेमकं आपल्याला काय सांगायचं आहे याचा पत्ता मुळात लेखक – दिग्दर्शकाला नसतो. त्यांच्या मनातला गोंधळ कथानकातही उमटतो आणि पुढे मांडणीतही तो जाणवतो. त्यामुळे अनेकदा उत्तम कथा, कलाकार हाताशी असताना आणि मांडणीच्या बाबतीत आव्हान स्वीकारण्याची तयारी असतानाही कुठेतरी त्याच त्याच सोप्या गोष्टींचा आधार घेण्याचा मोह, विचारातली अस्पष्टता यामुळे चित्रपट फसतो. निखिल नागेश भट दिग्दर्शित ‘अपूर्वा’ हा डिस्ने हॉटस्टार प्लसवर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहताना या गोष्टी सातत्याने जाणवतात.
‘अपूर्वा’ हा चित्रपट शीर्षकावरूनच नायिकाप्रधान असल्याचं लक्षात येतं. या चित्रपटाची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे असं म्हणता येणार नाही. याचं कारण या चित्रपटात दाखवलेल्या घटनेसारख्या अनेक घटना देशभरात विविध भागांत कमीअधिक प्रमाणात घडत असतात. त्यामुळे गोष्ट तशी नवीन नाही, पण या कथेला अनुरूप वेगवान मांडणी करण्याचा किमान चांगला प्रयत्न दिग्दर्शक निखिल नागेश भट यांनी केला आहे. आपल्या वाग्दत्त वराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून या चित्रपटाची नायिका अपूर्वा (तारा सुतारिया) तो जिथे नोकरी करतो आहे त्या आग्रा शहरात जाण्यासाठी निघाली आहे. बसच्या या प्रवासादरम्यान एका छोटय़ाशा कारणावरून मागून येणारी गाडी आणि बसचा चालक यांच्यात बाचाबाची होते. गाडीतील गुंड तरुण बसच्या चालकाची हत्या करतात. बस लुटण्याचा प्रयत्न करतात आणि अखेर त्याच बसमधून प्रवास करणाऱ्या अपूर्वाचं अपहरण करून तिथून निघून जातात. या गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी अपूर्वाने केलेला संघर्ष हा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. एका दुर्दैवी परिस्थितीचा मोठय़ा धीराने सामना करत त्यातून बाहेर पडलेल्या सामान्य स्त्रीचा असामान्य संघर्ष चितारण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>“मराठी पोरी…” ‘झिम्मा २’ मधील गाण्यावर अविनाश नारकरांचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ बघून बायकोनेही केली कमेंट, म्हणाल्या..
दोन वेगवेगळय़ा कथा आणि त्यातील पात्रांची समांतर गोष्ट सुरू असते. गाडीतल्या गुंड टोळीची, त्यांच्या बेफिकिर-हिंसक वृत्तीची ओळख पहिल्या काही प्रसंगांतून होते. त्याच वेळी मध्ये मध्ये काही प्रसंगांची पेरणी करत अपूर्वाचे आई-वडील, सिद्धार्थशी झालेली भेट, साखरपुडा अशी तिची गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न होतो. एका वळणावर गुंड टोळी आणि अपूर्वा एकत्र आल्यानंतर सुटकेसाठीचा तिचा संघर्ष अशी काहीशी सुटसुटीत मांडणी दिग्दर्शकाने केली आहे. त्यामुळे एकतर कथेत जास्त फापटपसारा राहिलेला नाही, त्याची लांबीही आटोक्यात आहे. आणि अशा थरारक कथानकाची वेगवान मांडणीची गरजही दिग्दर्शक पूर्ण करतो. आणखी एक बाब या चित्रपटाच्या बाबतीत वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल. राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी हे दोन ताकदीचे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आत्तापर्यंत हे दोघेही प्रामुख्याने विनोदी बाजाच्या चित्रपटातील अभिनयासाठी प्रसिद्ध राहिले आहेत. इथे त्यांच्या या प्रचलित पडद्यावरील प्रतिमेला पूर्णपणे फाटा देणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या वाटय़ाला आल्या आहेत. एकाअर्थी बिनडोक, अविचारी, पैशासाठी कोणाचीही सहज निर्घृण हत्या करणारे, कशाचंही सोयरसुतक नसलेले, पोलिसांचीही भीती नसलेल्या या गुंडांच्या भूमिका राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केल्या आहेत. अभिषेकने तर चित्रपटासाठी पूर्णपणे एक वेगळाच लूक धारण केला आहे. त्यामुळे त्यांना या नकारी व्यक्तिरेखांमधून पाहणं हा एक वेगळा अनुभव ठरतो. मात्र बव्हंशी चित्रपटातील कथेचा जोर हा अपूर्वाच्या संघर्षकथेवर आहे किंवा तेच दिग्दर्शकाला दाखवायचं असावं असं आपल्याला वाटत राहतं. इथे ही जबाबदारी अभिनेत्री तारा सुतारियाच्या खांद्यावर आली आहे. तिने तिच्या परीने अपूर्वाच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अपूर्वाच्या भूमिकेचा पैस पाहता आणि तिच्या भूमिकेतून जो अपेक्षित परिणाम साधायचा आहे तो पाहता त्यासाठी अधिक ताकदीची अभिनय क्षमता असलेल्या अभिनेत्रीची गरज होती असं प्रामाणिकपणे वाटतं. त्यातल्या त्यात अभिनयाची ही बाजू राजपाल आणि अभिषेक यांच्यामुळे सावरली गेली आहे. सिद्धार्थच्या भूमिकेत धैर्य कारवाची निवडही ताजीतवानी करणारी आहे, मात्र त्याच्या भूमिकेला फार वाव देण्यात आलेला नाही. त्यामुळे मोजक्याच व्यक्तिरेखा असूनही त्यातील समतोल कमी पडला आहे.
अभिनयाच्या जोडीला चित्रपटाच्या सफाईदार आणि वेगवान दिग्दर्शकीय मांडणीमुळेही काही प्रसंगांत चित्रपट पाहणाऱ्याला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र तरीही एका टप्प्यावर चित्रपटाचा शेवट काय हे लक्षात येतं. त्यामुळे त्यातली गंमत निघून जाते. आणि काही प्रसंग ताकदीचे झाले आहेत हेही खरं असलं तरी मधूनच उपटलेला ज्योतिषी, त्याची आणि सिद्धार्थची आधी झालेली भेट अशा काही व्यक्तिरेखा आणि प्रसंगांची मांडणी मुळात कशासाठी? हे लक्षात येत नाही. अत्यंत हिंसक, बिनडोक टोळक्याच्या कारवाया आणि त्यांचा सामना करणारी अपूर्वा आधी परिस्थितीतून सुटण्याचा प्रयत्न करते, मात्र स्वत:चा जीव वाचवताना एका क्षणी ती शस्त्र हातात घेते, तिच्या मनातलं भय संपतं आणि ज्यांनी आपल्याला छळलं त्यांना यमसदनास पाठवण्याचा निर्णय ती घेते. असाहाय्य तरुणी ते निर्धाराने त्यांना संपवण्यासाठी उभी ठाकलेली तरुणी हे अपूर्वाचं स्थित्यंतर हा पैलू खूप महत्त्वाचा आहे. ‘अपूर्वा’ चित्रपटाच्या बाबतीत या काही गोष्टी जमून आल्या आहेत खऱ्या.. पण शेवटी तो एक प्रश्न पडतोच ‘आखिर कहना क्या चाहते हो.. ’
अपूर्वा
दिग्दर्शक – निखिल नागेश भट्ट
कलाकार – तारा सुतारिया, अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव, धैर्य कारवा.