रेश्मा राईकवार
तर्कबिर्क सगळं बाजूला ठेवून नुसताच समोर घडवला गेलेला विनोद पाहात हसणं इतक्याच उद्देशाने बनवलेले हिंदीतले ‘धमाल’, ‘डबल धमाल’सारखे हिंदी चित्रपट पाहायला आवडत असतील तर त्याची मराठी आवृत्ती म्हणजे परितोष पेंटर दिग्दर्शित ‘अफलातून’ हा चित्रपट म्हणता येईल. सध्या चित्रपटगृहात दोन मोठय़ा हॉलीवूडपटांबरोबर हा एकच नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. केवळ विनोदासाठी विनोद या एकाच उद्देशाने बनवलेल्या या चित्रपटाची तुलना वर उल्लेख केलेल्या हिंदी चित्रपटांशी करायचं कारण एकच.. या चित्रपटांचा कर्ता-करविता म्हणजेच लेखक एकच आहे. परितोष पेंटर या हिंदीत प्रसिद्ध असलेल्या लेखक-अभिनेत्याने ‘अफलातून’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे.
‘अफलातून’ या चित्रपटाची कथा श्री, आदि आणि मानव या तीन मित्रांभोवती फिरते. या तिघांमध्ये एकाला ऐकू येत नाही, एकाला पाहता येत नाही आणि एकाला बोलता येत नाही. तरीही या तिघांकडे स्वत:चं म्हणून एक विलक्षण कौशल्य आहे आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर तिघंही मिळून गुप्तहेर म्हणून काम करतात. तर गोव्याला निघालेले हे तीन मित्र बसच्या प्रवासात घडलेली चोरी पकडून देतात. खरं तर त्या चोरीसाठी त्यांनाच पकडून पोलीस इन्स्पेक्टर आलिया सावंतने पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं असतं. मात्र आपल्या गुप्तहेरगिरीच्या बळावर तिघंही पोलीस ठाण्यात खऱ्या चोराला पकडून देतात आणि स्वत: बाहेर पडण्याच्या बेतात असतानाच तिथे घडणाऱ्या कुजबुजीतून त्यांना आपली पुढची कामगिरी मिळते. गोव्यात स्थायिक असलेल्या मारियाचं घर तिच्या वडिलांच्या मित्राने फसवून बळकावलं आहे. मारियाला ते घर मिळवण्यासाठी श्री, आदि आणि मानव एकत्र योजना आखतात. पुढे ही योजना ते कशी तडीस नेतात? त्यांना यश मिळतं का? की आणखी भलत्याच संकटात सापडतात, याची कथा ‘अफलातून’ चित्रपटात पाहायला मिळते.
हिंदीत लेखक-कलाकार म्हणून असलेला अनुभव आणि वावर यामुळे ‘अफलातून’ची निर्मिती करताना हिंदीप्रमाणेच खर्च परितोष पेंटर यांनी केला आहे. त्यामुळे निर्मितीमूल्यात चित्रपट कुठेही कमी पडत नाही. गोव्यात चित्रपटाचं चित्रीकरण झालं असलं तरी खास तिथलं सौंदर्य वगैरे टिपायचा काही विशेष प्रयत्न या चित्रपटात नाही. त्याउलट कथेत घडणाऱ्या प्रसंगानुरूप आवश्यक ते सेट उभारत पात्रांमधल्या संवाद आणि अभिनयातून करामती घडवणं या हिंदीतील विनोदी चित्रपटांच्या परिचित शैलीप्रमाणे दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी या चित्रपटाची मांडणी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथाही परितोष यांचीच आहे त्यामुळे लेखन आणि दिग्दर्शनातली सुसूत्रता बऱ्याच प्रमाणात साधली गेली आहे. मात्र दिग्दर्शनातलं नवखेपण ठायी ठायी जाणवत राहतं. विशषेत: चित्रपटाच्या संकलनाकडे अधिक लक्ष द्यायला हवं होतं. अनेकदा दृश्ये मध्येच कापली जातात, दुसऱ्याच दृश्याची सुरुवात होते. दोन प्रसंगांमधली संगती साधताना काही ठिकाणी गोंधळ झाला आहे, मात्र ज्या पद्धतीची मांडणी दिग्दर्शकाने निवडली आहे. त्यानुसार चित्रपटातील तीन मुख्य कलाकारांच्या तिकडीने काम चोख बजावले आहे.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने या चित्रपटात श्री या आंधळय़ा तरुणाची भूमिका साकारली आहे. खुद्द परितोष यांनी आदिची, तर जयेश ठक्कर यांनी मानवची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थला खूप दिवसांनी विनोदी भूमिकेत पाहण्याची संधी हा चित्रपट देतो. परितोष आणि जयेश हे दोन्ही मराठी प्रेक्षकांसाठी नवीन चेहरे आहेत, मात्र आदि आणि मानव या दोन व्यक्तिरेखांमधील संवादाची देवाणघेवाण, एक मुका आणि एक बहिरा असल्याने एकमेकांना सांभाळून घेत संवाद आणि अभिनयाचं टायिमग या दोघांनीही चांगलं जुळवलं आहे. श्वेता गुलाटीने मारियाच्या भूमिकेत या तिघांना चांगली साथ दिली आहे. भरत दाभोळकर, विजय पाटकर, जॉनी लिव्हर आणि तेजस्विनी लोणारी यांना मधली बाजू सांभाळायचं काम दिलं आहे, त्यामुळे फार काही वेगळं त्यांच्याकडे नाही. दुसरं म्हणजे कमरेखालचे वा द्वयर्थी संवादांचा वापर, विनोद निर्माण करण्यासाठी ओढूनताणून केलेले अंगविक्षेप या गोष्टी चित्रपटात आढळत नाहीत. त्यामुळे निव्वळ रंजक विनोदी चित्रपट म्हणून तो पाहणं शक्य झालं आहे. गाणी वा भडक नाटय़ही चित्रपटात नाही. चित्रपटाच्या शेवटी चांगल्या पद्धतीने चित्रित केलेलं गाणं प्रेक्षकांना दाखवलं जातं. त्यामुळे केवळ गोष्टीशी प्रामाणिक राहात ‘अफलातून’ हा चित्रपट आपलं मनोरंजन करतो.
अफलातून
दिग्दर्शक – परितोष पेंटर
कलाकार – सिद्धार्थ जाधव, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जॉनी लिव्हर, भरत दाभोळकर, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, श्वेता गुलाटी.