सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘नाळ’ या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या चित्रपटाचा नायक छोटा चैतन्य म्हणजेच चैतूने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘नाळ’ चित्रपटामधील पहिल्या भागात खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईला भेटून तिच्याशी संवाद साधू शकेल का? या दोघांच्या नात्यात असलेलं अंतर गळून पडेल का? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ‘नाळ २’ मध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. ‘नाळ २’ या चित्रपटात बालकलाकार श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप आणि जितेंद्र जोशी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाबद्दल ‘नाळ २’ चे निर्माते आणि कलाकारांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला.
‘नाळ २’ या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सांगताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘नाळ या चित्रपटात भाबडेपणा आणि साधेपणा दाखवण्यात आला आहे. हा माझा चित्रपट नसला तरी माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. सुधाकरने पहिल्यांदा जेव्हा या चित्रपटाची कथा सांगितली तेव्हा मला असं वाटलं मी चैत्या असावं.. माझंही असं घर असावं, असे आई-बाबा असावेत. मी आणि देविका आम्ही हा चित्रपट जगत होतो. एका काळानंतर अभिनय सुरू आहे याचा विसर पडल्यासारखं होतं, तेच खरं आयुष्य आपण जगतोय असं वाटू लागतं. चैतूच्या गोष्टीशी मी स्वत:ला जोडून घेऊ शकतो, कारण खऱ्या आयुष्यात मी देखील दत्तक मुलगा होतो. त्यामुळे चैतूचं भावविश्व मी समजून घेऊ शकत होतो’.
‘नाळ’च्या दुसऱ्या भागाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील याबद्दल बोलताना झी स्टुडिओचे व्यवसायप्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणाले, ‘नाळ’ या चित्रपटाचा शेवट जसा झाला त्यानंतर ‘नाळ २’ एकप्रकारे चैत्याच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देणारा चित्रपट आहे असं म्हणता येईल. सुधाकरने दुसऱ्या भागाची गोष्ट सांगितल्यावर आमच्या लक्षात आलं हा चित्रपट ‘नाळ’च्याच तोडीचा आहे, त्यामुळे दुसरा भाग प्रदर्शित होण्याचं दडपण नव्हतं. उलट हा चित्रपट कधी चित्रित होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे असं आम्हाला झालं होतं. इतकी उत्सुकता आमच्या मनात होती’. ‘नाळ’चा हा नवीन भाग बघितल्यानंतर जर ‘नाळ ३’ यावा असं प्रेक्षकांना वाटलं तर आमच्या कामाचं सार्थक झालं असं आमच्या संपूर्ण टीमला वाटेल, असंही कुलकर्णी यांनी सांगितलं.
चैतूची भूमिका केली तेव्हा खूप लहान होतो..
‘नाळ २’ मध्ये पुन्हा चैतूची भूमिका साकारतानाचे अनुभव यावेळी श्रीनिवास पोकळे याने सांगितले. ‘नाळ प्रदर्शित झाला तेव्हा मी फारच लहान होतो त्यामुळे त्याच्या चित्रीकरणावेळी इतकी समज नव्हती. हा दुसरा चित्रपट करताना मात्र मला बऱ्याच गोष्टी समजू शकल्या, असं त्याने सांगितलं. एखादं दृश्य दिल्यानंतर आपण कसं काम केलं आहे, कोणतं दृश्य सध्या चित्रित होतं आहे, पुढे काय असणार आहे? हे सगळं मला समजायला लागलं होतं त्यामुळे काम करताना अधिक मजा येत होती, असं श्रीनिवासने सांगितलं. त्याच वेळी चैतूच्या बहिणीची चिमीची भूमिका साकारणाऱ्या लहानग्या त्रिशाबरोबर काम करणं थोडं आव्हानात्मक होतं, असं त्याने सांगितलं. कारण सुरुवातीला तिला सांभाळून घ्यावं लागायचं. नंतर हळूहळू तिला चित्रीकरणाची प्रक्रिया समजायला लागली. तेव्हा काम करताना खरी मजा आली, असं त्याने सांगितलं.
‘नाळ’ची यशोदा आणि देवकी..
या चित्रपटाबद्दल आणि सुमी या पात्राबद्दल सांगताना देविका दफ्तरदार म्हणाल्या, पहिल्या भागात खूप प्रेम मिळालं, या चित्रपटात आम्ही जरा अधिक उत्साहाने काम केलं आहे. ‘एक अभिनेता म्हणून लहान मुलांसोबत काम करणं आव्हानात्मक असतं. त्यांना सांभाळून घेऊन काम करावं लागतं, पण कलाकार म्हणून ते उत्तम आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला अजूनच उत्साह यायचा. आई होणं हे त्याहून अधिक आव्हानात्मक असतं. त्याच्यानुसार तुम्हाला काम करायचं असतं, असं देविका यांनी सांगितलं.
तर या चित्रपटात चैतूची खरी आई म्हणजे पार्वती या पात्राबद्दल सांगताना दीप्ती देवीने ‘नाळ’ चित्रपटामध्ये आपला भाग अगदी लहान होता, पण तरी तो प्रेक्षकांच्या मनाला भिडला होता याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘पहिल्या भागात मला जास्त संवादही नव्हते, पण आता या चित्रपटात चैतू आणि बाकी दोन्ही लहान मुलांबरोबर माझी महत्त्वपूर्ण दृश्यं आहेत. चैतू, मणी आणि चिमी अशा तीन लहान मुलांबरोबर माझी मुख्य भूमिका असल्याने दृश्याचं चित्रीकरण सुरू असताना या तिघांपैकी एखाद्याने वेगळंच वाक्य घेतलं तर त्यांना सांभाळून घेत ते दृश्य पूर्ण करताना तारेवरची कसरत व्हायची. अशी छोटी-मोठी आव्हानं पेलत आम्ही हा चित्रपट गंमती-जमती करत पूर्ण केला आहे, असं दीप्तीने सांगितलं.
शब्दांकन – श्रुती कदम