रेश्मा राईकवार
एखादी छोटीशीच गोष्ट, छोटीशीच घटना जगण्यातली मोठी गोष्ट समजावून सांगते. तसाच काहीसा निखळ अनुभव देणारा चित्रपट म्हणून आनंद करीर दिग्दर्शित ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचा उल्लेख करायला हवा. छोटय़ांचं निरागस विश्व आणि त्यांना समजून घेणाऱ्या मोठय़ांचं त्यांच्यामुळे बदलत जाणं ही एक वेगळीच प्रक्रिया असते. कुठलंही भडक नाटय़ नसलेला, निखळ मनोरंजनाबरोबरच महत्त्वाचं काही सांगू पाहणारा असा हा चित्रपट आहे.
लहान मुलगी, पत्नी आणि जिवाला जीव देणारा मित्र असा छोटेखानी परिवार असलेल्या सखाराम पाटलाचं (श्रेयस तळपदे) आयुष्य एरवी सरळसाधं, कोणाची दृष्ट लागू नये इतकं आनंदी आहे. पण त्याचा मुळचा कंजूष स्वभाव त्याचा प्रत्येक ठिकाणी घात करतो. पैसे वाचवण्यासाठी हरएक करामती करणारा सखाराम याच स्वभावापायी आपल्या मुलीच्या भावनांकडेही दुर्लक्ष करतो. एकीकडे पैशासाठी नियम, भावभावना धाब्यावर बसवणारा सखाराम आणि त्याच वेळी तिकीट तपासनीस म्हणून नियमाने चालणारा, मात्र माणुसकीला प्राधान्य देणारा दयानंद पगारे अशा दोन टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची कथा या चित्रपटात पाहायला मिळते. सखारामच्या मुलीचा जीव तिच्या घरच्या शेळीच्या पिल्लात अडकला आहे. तिने तिचं नाव पिकू ठेवलं आहे. तिचा हा जिवाभावाचा दोस्त वडिलांच्या म्हणजेच सखारामच्या चुकीमुळे तिच्यापासून दूर जातो. आपण मुलीच्या भावना दुखावल्यात हे उशिराने का होईना लक्षात आलेला सखाराम आपल्या कंजूष स्वभावापायी पुन्हा पुन्हा चुका करत राहतो. एका क्षणाला त्याच्या या वृत्तीमुळे सगळीच परिस्थिती त्याच्या अंगलट येते, असे काहीसे ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचे कथानक आहे.
चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी आनंद करीर आणि सुनील करीर यांनी सांभाळली आहे. कथा आणि एकूणच दिग्दर्शकीय मांडणी यात एकवाक्यता साधण्याचं शिवधनुष्य पेलणं म्हणूनच आनंद करीर यांना शक्य झालं असावं. मूळ कथेचा जीव खरं तर खूप छोटा आहे, पण ती कथा फुलवत त्यातल्या छोटय़ा-छोटय़ा भावभावनांचा पट प्रेक्षकांसमोर उलगडत नेण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरला आहे. आणि अर्थात त्याला उत्तम कलाकारांच्या अभिनयाची जोड मिळाली आहे. प्रत्येक वेळी गोष्टीत खूप काही नाटय़ आणलं, खूप साऱ्या वा गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा आणल्या तरच चित्रपट रंगत जातो वगैरे समज किमान हा चित्रपट पाहताना खोटा ठरला आहे. हलकीफुलकी मांडणी, मोजकेच कलाकार, चुरचुरीत संवाद या सगळय़ाच्या जोरावर हा चित्रपट दिग्दर्शकाने रंगवला आहे. तरीही सखाराम आणि त्याच्या मुलीतलं घट्ट नातं, त्याच्या बायकोबरोबरचं त्याचं विश्व या गोष्टी आणखी चांगल्या पध्दतीने दाखवता आल्या असत्या. त्यातही श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे अशी आघाडीची कलाकार जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असल्याने चित्रपटाबद्दल अपेक्षा वाढणं साहजिक आहे. इथे मात्र दिग्दर्शकाने कलाकारांच्या प्रतिमेत अडकून पडण्यापेक्षा कथेवर अधिक भर दिला आहे.
अभिनेता म्हणून श्रेयस तळपदेला मुळात मराठी चित्रपटात इतक्या वर्षांनी पाहण्याची संधी या चित्रपटाने देऊ केली आहे. मुक्तानेही आजवर केलेल्या गुंतागुंतीच्या भूमिकांपेक्षा अगदी साधी आणि सरळ अशी ही भूमिका आहे. तिलाही अशा निखळ भूमिकेत पाहणे पर्वणी ठरते. संदीप पाठकचा नाम्या आणि नंदू माधव यांचा दयानंद पगारे दोन्ही व्यक्तिरेखा भन्नाट जमल्या आहेत. नवीन प्रभाकरसारखा थोडासा विस्मृतीत गेलेला विनोदी अभिनेता या चित्रपटात खलनायकी भूमिकेत दिसला आहे. एकूणच कथा, अभिनय आणि मांडणी सगळय़ात सरस ठरलेली अशी ही ‘आपडी थापडी’ची गोड गोष्ट आहे.
आपडी थापडी
दिग्दर्शक – आनंद करीर
कलाकार – श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, नंदू माधव, आशा शेलार.