रेश्मा राईकवार
गावखेडय़ात मोबाइल पोहोचले, आधुनिक सोयीसुविधा पोहोचल्या, घरोघरी शौचालयापासून कित्येक गोष्टी पोहोचल्या असल्या म्हणून प्रत्येकाची प्रगती झाली असं म्हणणं ही शुद्ध फसवणूक आहे. या सोयी-सुविधा गावखेडय़ात अजूनही ठरावीक वर्गापुरतीच मर्यादित आहेत. वीज-पाणी, निवाऱ्यासाठी पक्कं घर या मूलभूत गोष्टींपासून वंचित असलेला खूप मोठा समाज अजूनही जातीचं दुष्टचक्र भेदू शकलेला नाही, या जळजळीत वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिग्दर्शक – अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी ‘मोऱ्या’ या चित्रपटातून केला आहे.
‘मोऱ्या’ या चित्रपटाचा विचार करताना त्याची संकल्पना, निर्मितीमागचा उद्देश या सगळय़ाच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जितेंद्र बर्डे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन केलं आहे. त्यांनीच दिग्दर्शन केलं आहे आणि या चित्रपटातील मोऱ्याची मुख्य भूमिकाही त्यांनीच केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्यही जितेंद्र आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन पेललेलं आहे. त्यामुळे एक महत्त्वाचा विषय अत्यंत संवेदनशीलतेने लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची तगमग या चित्रपटाच्या मांडणीतून दिसते. या चित्रपटाचा नायक मोऱ्या ऊर्फ सीताराम जेधे हा सफाई कामगार आहे. घरोघरचे संडास साफ करणारा, रस्त्यावरच्या गटारांत-नाल्यात उतरून साफसफाई करणाऱ्या सीतारामला त्याच्या नावाने हाक कधीच मारली जात नाही. तो लोकांच्या मोऱ्या साफ करतो म्हणून गावाने त्याचं नावच मोऱ्या केलं आहे. हलक्या जातीचा, गावची घाण साफ करणारा मोऱ्या आणि त्याच्या सहकाऱ्यांना गावात कुठलंच स्थान नाही. गावाच्या वेशीबाहेर त्यांची तीन-चार घरांची वस्ती आहे. मोऱ्या आणि त्याच्या सहकाऱ्यांना देवाच्या गाभाऱ्यात जाण्याचीही परवानगी नाही. हे सगळं पाहात असताना पुरोगामी राज्यात राहात असल्याच्या आपल्या जाणिवा किती फुकाच्या आहेत या विचाराने स्वत:चीच कीव आल्याशिवाय राहात नाही.
हेही वाचा >>>शरद पोंक्षेंची रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाले, “खूप लोक…”
मोऱ्याची कथा मांडताना जितेंद्र बर्डे यांनी सफाई कामगारांच्या या दारुण परिस्थितीकडे लक्ष वेधतानाच त्यांचा वापर राजकारणी मंडळी सत्ता टिकवण्यासाठी कसा करून घेतात? शासकीय नियमांचे, योजनांचे कशा पद्धतीने वाभाडे काढले जातात? समाजातील दुर्बल, वंचित घटकांना न्याय मिळाला, त्यांची प्रगती झाली याचं फसवं चित्र उभं करत त्यांना नाडण्यात कुठलीही कसर न ठेवणाऱ्या गावच्या सरपंचापासून ते पक्षाच्या धुरिणापर्यंत आणि गावातील सधन -तथाकथित उच्च जातीच्या लोकांच्या मानसिकतेचं चित्रणही बर्डे यांनी चित्रपटात केलं आहे. ‘मोऱ्या’ हा चित्रपट करताना लेखक – दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, त्यामुळे चित्रपटाची मांडणीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही वास्तवाचं बोट सोडत नाही.
मोऱ्यासारख्या कित्येकांची होणारी फसवणूक आणि त्यांच्या वाटय़ाला आलेलं दुर्दैवी आयुष्य हे जळजळीत वास्तव आहे, मात्र त्याचं चित्रण करताना ते दाहक वा प्रखरतेने मांडण्याचा प्रयत्न बर्डे यांनी केलेला नाही. त्याउलट आपल्या वाटय़ाला जे आलं ते आपल्या मुलाच्या वाटय़ाला येऊ नये यासाठी संधीची वाट पाहणाऱ्या मोऱ्याला तशी संधी मिळते. मात्र त्या संधीचं फक्त गाजर त्याला दाखवलं जातं. एका सफाई कामगाराचा सरपंच होतो, पण त्याची जात सुटत नाही. त्याचं दुर्दैव कमी होत नाही. उलट आर्थिकदृष्टय़ा मागास असलेल्या त्याच्यासारख्या लोकांसाठी असलेल्या संधीही जेव्हा एका वर्गाकडून लुबाडल्या जातात तेव्हा या असल्या प्रगतीपेक्षा आपल्या आयुष्यातील अंधकारच बरा.. या जाणिवेने पोळणाऱ्या मोऱ्याची घालमेल दाखवत हा विषय अत्यंत संवेदनशीलपणे बर्डे यांनी मांडला आहे. कुठेही पाल्हाळ न लावता अनेक गोष्टीतील विसंगती त्यांनी दाखवून दिली आहे. गावच्या सरपंचपदासाठी उमेदवार अनुसूचित जातीचा असावा असा सरकारचा फतवा आणि या उमेदवाराच्या डोक्यावर भलेही पक्क्या घराचं छत असो वा नसो. त्याच्या घरात शौचालय हवं हा अजब सरकारी नियम. मात्र या नियमामुळे मोऱ्याला शौचालय का होईना बांधून मिळतं. जातीव्यवस्थेची पाळंमुळं समाजात इतकी घट्ट भिनलेली आहेत की तृतीयपंथीयाच्या घरात मतं मागण्यासाठी गेलेल्या मोऱ्याला चांगली वागणूक तर दूरच पण त्याने आपलं घर बाटवलं म्हणून मारहाण केली जाते. हे दुर्दैव मागासलेपणातून आलेलं की जातीच्या उतरंडीतून.. अत्यंत स्पष्टपणे जितेंद्र बर्डे यांनी या उपेक्षित जगण्यामागचं दु:ख, त्यांची ससेहोलपट, समाजातील वैचारिक मागासलेपण या गोष्टी मांडल्या आहेत.
या चित्रपटात अभिनेता उमेश जगताप वगळता एकही नावाजलेला चेहरा नाही, मात्र यातील प्रत्येक कलाकाराने अत्यंत सहज अभिनयाने आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचा सगळा जोर मोऱ्यावर असल्याने अभिनयाची मुख्य धुरा जितेंद्र बर्डे यांच्यावरच होती. त्यांनी ती लीलया पेलली आहे. लेखन वा मांडणीत कुठलाही कलात्मक अभिनिवेश चित्रपटात नाही. एका महत्त्वाच्या विषयाची तितकीच सरळ-स्पष्ट आणि भावस्पर्शी मांडणी करण्याचा प्रयत्न यामुळे ‘मोऱ्या’ चित्रपटाचा विषय आपल्यापर्यंत थेट पोहोचतो. त्यामुळे उत्तम मांडणी, चित्रण यांच्या चौकटीत न बसवता त्यातल्या विषयासाठी म्हणून का होईना हा चित्रपट पाहायला हवा.
मोऱ्या
दिग्दर्शक – जितेंद्र बर्डे
कलाकार – जितेंद्र बर्डे, उमेश जगताप, संजय भदाने, कुणाल पुणेकर, रुद्रम बर्डे, धनश्री पाटील.