महाराष्ट्रातील सगळ्याच थोर इतिहासपुरुषांनी उभारलेले कार्य, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, तळागाळातील समाजाच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, त्यांच्या वाट्याला आलेले संघर्ष, त्या त्या काळात त्यांनी परिस्थितीनुसार आणि त्यांच्या वैचारिक क्षमतेनुसार घेतलेले निर्णय या सगळ्याच गोष्टींना आजच्या काळात नवनव्या वादाचं परिमाण तेवढं लाभलं आहे. अशा परिस्थितीत एखाद्या महात्म्याची परिचयाची जीवनकथा पडद्यावर रंगवतानाही दिग्दर्शकाचा त्या गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. ‘फुले’ पाहताना दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा या चित्रपटामागे असलेला वेगळा विचार जाणवतो.
सर्वधर्मसमभाव आणि समान न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा जोतिबा फुले हे स्वत: आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातले होते. आपल्या ब्राह्मण मित्रांबरोबर एकत्र स्कॉटिश मिशनरी शाळेत शिक्षण घेणाऱ्या जोतिबांना शाळेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा समाजात असलेल्या जातिभेदाची जाणीव झाली. शूद्र आहेस म्हणून मित्राच्या घरी असलेल्या लग्न सोहळ्यातून त्यांना बाहेर काढण्यात आलं. आपल्याला मिळणारी ही अन्याय्य वागणूक, आपल्या समाजातील लोकांच्या आयुष्यात असलेला अंधकार दूर सारायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले होते. या एका विचारातून आणि थॉमस पेन यांचे ‘राइट्स ऑफ द मॅन’ या पुस्तकाच्या प्रभावातून शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या जोतिबा यांनी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या साथीने सुरू केलेले कार्य कसे कसे आकाराला येत गेले? याची साधीसरळ मांडणी दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ‘फुले’ या चित्रपटातून केली आहे.
खरंतर ‘फुले’ या चित्रपटाआधी मराठीत नीलेश जळमकर लिखित, दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ या चित्रपटातून फुले दाम्पत्याने उभारलेल्या कार्याची कथा प्रेक्षकांनी अनुभवली आहे. ‘फुले’ पाहताना त्या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहात नाही, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नीलेश जळमकर यांनी अतिशय छोट्या-छोट्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून महात्मा फुलेंची कथा पडद्यावर रंगवली होती. त्या तुलनेत ‘फुले’ चित्रपटाची मांडणी ही अगदीच मोजक्या ठळक घटनांच्या आधारे सरळसोट पद्धतीने करण्यात आली आहे. तरीही हा चित्रपट दोन कारणांनी वेगळा ठरतो. एक म्हणजे फुले दाम्पत्याने उभारलेले कार्य आणि समाजाच्या विकासाच्या दृष्टीने त्याचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व याची कथा पहिल्यांदाच हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली आहे. दुसरं म्हणजे या चित्रपटात जोतिबा आणि सावित्रीबाई यांचा एकत्रित प्रवास दिसतो, पण त्यातही सावित्रीबाईंचे विचार, त्यांचा बदलत गेेलेला दृष्टिकोन आणि कित्येक वेळा स्वत:हून केलेले नेतृत्व या गोष्टी दिग्दर्शक म्हणून अनंत महादेवन यांनी ठळकपणे मांडल्या आहेत.
या चित्रपटात जोतिबा-सावित्रीबाई यांच्या मुख्य भूमिका निभावणाऱ्या अभिनेता प्रतीक गांधी आणि पत्रलेखा दोघांनीही चोख काम केले आहे. जोतिबांच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेता विनय पाठक बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांसमोर आले आहेत. सुनीता राडिया यांनी केलेले छायाचित्रणही खूप सुंदर आहे. फुले वाड्याचा दर्शनी भाग, अंगणातली शेती, जोतिबांच्या अखेरच्या काळातील सूर्यास्ताचा प्रसंग अशी काही दृश्ये सुनीता यांच्या कॅमेऱ्याने खूप सुंदर टिपली आहेत. चित्रपटात दोनच गाणी आहेत, त्यातले ‘साथी’ हे गाणे श्रवणीय आहे. जोतिबा आणि सावित्री यांच्यातील घट्ट नात्यांची वीण आणि उदात्त ध्येयाच्या दिशेने त्यांनी केलेला एकत्रित प्रवास या मांडणीवर भर दिल्याने दोन ध्येयवेड्यांची गोष्ट इतक्या मर्यादित अर्थाने हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतो.
फुले
दिग्दर्शक – अनंत महादेवन
कलाकार – प्रतीक गांधी, पत्रलेखा, विनय पाठक, अक्षया गुरव, आकांक्षा गाडे, अमित बहल, दर्शिल सफारी.