नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस उलटले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असल्याचे दिसत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत आहे. याआधी सगळ्या दिग्दर्शकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या स्क्रिनिंगनंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप जेव्हा थिएटर बाहेर आला तेव्हा त्याने नागराज मंजुळेचे कौतुक केले आहे.
अनुरागने थिएटरमधून बाहेर येताच नागराज मंजुळे यांना मिठी मारली. त्यावेळी अनुरागला चित्रपट पाहून आनंदअश्रू आले. तर अनुराग त्यावेळी म्हणाला, “मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांमध्ये ‘झुंड’ हा सर्वाधिक चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्या रांगा लागतील. हा चित्रपट पाहिल्यानंतर मला पुन्हा एकदा जाऊन फिल्ममेकिंग शिकावस वाटतंय. हा चित्रपट अप्रतिम आहे. नागराज मंजुळेने अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे. चांगल वाटतं जेव्हा कोणता दिग्दर्शक आपल्या लोकांसाठी चित्रपट बनवतो आणि त्यांच्यासाठी उभा देखील राहतो. हा फक्त अप्रतिम दिग्दर्शक नाही तर पागल आणि निडरसुद्धा आहे. या चित्रपटाच्या कास्टिंग डिरेक्टरला विशेष पुरस्कार दिला पाहिजे कारण चित्रपटात एकाच वेळी अभिनय न येत असलेलेले इतके कलाकार आणि त्यांच्याकडून असा अभिनय करून घेणं हे अप्रतिम आहे.”
आणखी वाचा : “आरव कोणाला सांगत नाही की तो माझा मुलगा आहे कारण…”, अक्षय कुमारने केला होता खुलासा
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ७ कोटींची कमाई केली आहे.