अभिनेता हा रियाज आणि मेहनतीने घडतो, मोठा होतो. दोन-चार मालिका केल्या म्हणून तो मोठा होत नाही, असे प्रतिपादन अभिनेते व दिग्दर्शक अतुल पेठे यांनी नुकतेच केले.
‘पारिजात’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘फक्त लढ म्हणा’ कार्यक्रमात अजित भगत यांच्या हस्ते पेठे यांना यंदाचा रंगभूमी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी अशी तुलना आपल्याला मान्य नसल्याचे सांगून पेठे म्हणाले, पदव्या व पुरस्कार यांच्या मागे न लागता अभिनेत्याने अभिनय समजून आणि उमजून करावा.कार्यक्रमात सात मान्यवरांनी सात मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. यात सुशील इनामदार (नारायण सुर्वे-सत्या), ऋतुजा बागवे (शांता शेळके-पैठणी), संकर्षण कऱ्हाडे (अरुण काळे-आईसाठी), माधवी जुवेकर (नारायण सुर्वे-तुमचंच नाव लिवा मास्तर), सुयश टिळक (विंदा करंदीकर-सब घोडे बाराटक्के), अतुल तोडणकर (मंगेश पाडगावकर-जेव्हा आपण प्रेम करतो), संजय खापरे (कुसुमाग्रज-फक्त लढ म्हणा) यांचा समावेश होता. ‘पारिजात’ संस्थेच्या ‘बॅक टु स्कूल’ हा ध्वनिचित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. संस्थेतर्फे करण्यात येणाऱ्या विविध सामाजिक कामाची माहितीचे सादरीकरण यात करण्यात आले होते.

Story img Loader