अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र पार्ट १: शिवा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतरही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३६० कोटींपेक्षा जास्तीचे कलेक्शन केले आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी चित्रपट बॉयकॉट ट्रेंडमुळे फ्लॉप होऊ शकतो अशी भीती निर्मात्यांना होती. या चित्रपटामधल्या शाहरुख खानच्या कॅमिओची सर्वत्र चर्चा आहे. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागामध्ये मध्ये त्याने दिल्लीमध्ये राहणाऱ्या ‘मोहन भार्गव’ नावाच्या एका वैज्ञानिकाचे पात्र साकारले आहे.
ब्रह्मास्त्र पार्ट १: शिवाच्या सुरुवातीला अयान मुखर्जीच्या अस्त्रवर्सची संकल्पना प्रेक्षकांसमोर मांडली जाते. त्यानंतर शाहरुखच्या कॅमिओमुळे खऱ्या अर्थाने चित्रपट सुरु होता. त्याने साकारलेला मोहन भार्गव वानरास्त्राशी जोडलेला असतो. तसेच त्याच्याकडे ब्रह्मास्त्रच्या तीन तुकड्यांपैकी एक तुकडा सांभाळण्याची जबाबदारी दिलेली असते. हा तुकडा मिळवण्यासाठी त्याच्यावर हल्ला होता. या पात्रावर आधारित चित्रपट बनवण्याची मागणी शाहरुखचे चाहते करत आहेत.
चित्रपटातल्या या सीन्सबद्दल बोलताना अयानने या पात्राची तुलना मार्व्हल सिनेमॅटीक यूनिव्हर्समधल्या ‘आयर्न मॅन’ (Iron man) या पात्राशी केली आहे. ब्रह्मास्त्र, अस्त्रवर्स आणि चित्रपटाच्या कथेवर बोलताना त्याने शाहरुखच्या भूमिकेशी संबंधित त्याचे मत मांडले आहे. अयान म्हणाला की, “नीट निरीक्षण करून सिनेमा पाहिल्यास तुम्हाला या पात्राचे सीन्स अॅव्हेंजर्स एन्डगेममधील (Avengers Endgame) आयर्न मॅनच्या शेवटच्या सीन्ससारखे वाटू शकतील. या दोन्ही दृश्यांमध्ये नायक इतरांसाठी आपला जीव देतो. शाहरुखच्या सीन्समधील भाव काहीसे गंभीर स्वरुपाचे आहेत. यात दुसऱ्यासाठी त्याग करणारा एक निस्वार्थ नायक आहे. याउलट चित्रपटातील उरलेल्या भागामध्ये शिवा आणि ईशा यांच्या प्रेमाचा भाव दाखवला आहे. मला संधी मिळाल्यास मी शाहरुखसह किंवा त्याच्याशिवाय वानरास्त्रावर आधारित चित्रपट बनवेन.”
आणखी वाचा – आमिरसारखं दिसण्याच्या नादात पाकिस्तानी अभिनेता पोहोचला रुग्णालयात, वाचा नेमकं काय घडलं
२०२५ मध्ये ब्रह्मास्त्र चित्रपट मालिकेतील दुसरा भाग ‘ब्रह्मास्त्र पार्ट २: देव’ प्रदर्शित होणार आहे.