‘ख्वाडा’, ‘बबन’, ‘टीडीएम’ अशा वास्तववादी धाटणीच्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण दाखवून देणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी ‘फकिरा’ या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान असलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या अप्रतिम कादंबरीवरचा चित्रपट ते घेऊन येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विषय आणि सादरीकरणाच्या कक्षा रुंदावणाऱ्या या भव्य चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी कलाकार मंडळी दिसणार आहेत. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने असे दिग्गज चेहरे चित्रपटात दिसणार आहेत. रुद्रा ग्रुप आणि चित्राक्ष निर्मिती यांच्या या चित्रपटात ‘फकिरा’ ही मध्यवर्ती भूमिका कोण करणार? हे अजून गुलदस्त्यात आहे.

 चित्रपटाच्या घोषणेप्रसंगी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची स्नुषा सावित्रीबाई मधुकर साठे, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेते नागेश भोसले, कमलेश सावंत, चित्रपटाचे डीओपी वीरधवल पाटील, लेखक मंदार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा >>>Video: रणबीर-आलियाच्या लेकीच्या ‘या’ व्हिडीओनं सगळ्यांचं वेधलं लक्ष, पाहा राहा कपूरचा क्यूट अंदाज

 ‘नशिबाने साथ दिली तर उत्तम कलाकृती साकारायला मिळते. माझ्या नशिबाने ‘फकिरा’ ही कलाकृती साकारण्याचे भाग्य मला मिळाले’, अशा शब्दांत भाऊराव कऱ्हाडे यांनी समाधान व्यक्त केले. ‘अशा विषयाचा चित्रपट करण्यासाठी अंगी अचाट धाडस लागते. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे याने हे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो असे म्हणत अभिनेते नागेश भोसले यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

 समाजाला भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, इंग्रजी राजवटीचा आत्यंतिक जुलूम आणि सर्वाविरोधात बंड करणारा लढवय्या ‘फकिरा’ याचे यथार्थ चित्रण करणाऱ्या ‘फकिरा’ कादंबरीचे चित्ररूप रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. २०२५ मध्ये ‘फकिरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director bhaurao karhade announced his new film fakira amy