कुठलाही उपदेशाचा अभिनिवेश न बाळगता आपल्याच घरातली गोष्ट आहे जणू अशा पद्धतीचे चित्रण करत हळूहळू प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेणारा, नात्यातील ताणेबाणे पाहायला, समजून घ्यायला उद्याुक्त करणारा आणि पडद्यावरच्या कुटुंबात रंगून जायला लावणारा मनोरंजक अनुभव लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे याने ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातून दिला आहे. कौटुंबिक मनोरंजन अशा ढोबळ चौकटीत बसवण्यापेक्षा इरसाल भावंडांची फर्मास गोष्ट म्हणून हा चित्रपट पाहायला हवा.

मराठी चित्रपटांत कौटुंबिक विषयही बऱ्यापैकी एका साचेबद्ध पद्धतीने मांडलेले दिसतात. त्यात पुन्हा ग्रामीण, शहरी भाग आणि त्यानुसार विषय अशी वर्गवारीही बऱ्यापैकी जाणवते. ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटातलं दाभाडे कुटुंब हे ग्रामीण भागातलं आहे, पण काळानुसार गावाकडच्या राहणीमानातही झालेले आधुनिक बदल दाखवताना निर्माते – दिग्दर्शक यांनी कुठेही संकोच केलेला नाही. आपल्याकडच्या कुटुंब व्यवस्थेतील प्रथा-परंपरा आणि नव्या पिढीने आपापल्या परीने केलेले किंवा स्वीकारलेले बदल यांचा धागा दाभाडे कुटुंबाच्या गोष्टीतही आढळतो.

Black Warrant Thrilling Prison Story Web Series reviews
‘ब्लॅक वॉरंट : थरारक तुरुंगकथा
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Actor Ashok Saraf conferred with Padma Shri
Ashok Saraf : अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, विनोदाच्या अनभिषिक्त सम्राटाचा सन्मान
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
krushna abhishek bought 3 bhk flat to put new clothes there
प्रसिद्ध कॉमेडियनने कपडे आणि बूट ठेवायला खरेदी केला ३ बीएचके फ्लॅट; दर सहा महिन्यांनी बदलतो कपड्यांचे कलेक्शन, म्हणाला…

चित्रपटाची सुरुवातच दाभाडे कुटुंबातील शेंडेफळ असलेल्या प्रशांत ऊर्फ सोनूच्या लग्नाच्या धामधुमीने होते. लग्नसराईतलं रंगीबेरंगी आणि उत्साहाचं वातावरण, सुपारी फुटणं, हळद कांडणं, पाहुण्यांची लगबग, मेंदीचा चढणारा रंग, हातात भरल्या जाणाऱ्या चुड्याची किणकिण हा सगळा जल्लोषाचा रंग आणि नाद यांचं अफलातून मिश्रण अनुभवत आपण दाभाडेंच्या घरात शिरतो. ‘फसक्लास दाभाडे’ या चित्रपटाला एक सरळसोट अशी कथा नाही. मात्र या चित्रपटातून किंबहुना त्यातील भावंडांच्या गोष्टीतून नेमकं काय काय सांगायचं आहे याबद्दलची स्पष्टता लेखक-दिग्दर्शकाकडे आहे. त्यामुळे कथेची बांधणी करतानाच यात त्या अनुषंगाने पात्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

दाभाडेंची तीन मुलं जयश्री (क्षिती जोग), किरण (सिद्धार्थ चांदेकर) आणि प्रशांत (अमेय वाघ) या तिघांचेही भिन्न स्वभाव, त्यांचा वर्तमान आणि भूतकाळ यांची सांगड घालत काही प्रसंगांची मालिका दिग्दर्शकाने उभी केली आहे. आणि या तिघांच्याही माध्यमातून येणारे वेगवेगळे विषय एका कुटुंबाची कथा म्हणून एकत्रित गुंफण्याची जबाबदारी लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही पातळ्यांवर हेमंत ढोमे याने लीलया पेलली आहे. लहानपणी एकत्र असलेली भावंडं काही ना काही कारणाने एकमेकांपासून कळत नकळत थोडी दूर होतात. बहिणी लग्न झालं म्हणून तर घरातले तरुण कामधंदा आणि अन्य जबाबदाऱ्यांमध्ये अडकत जातात. त्यांच्यातील सहजसंवाद कमी होत जातो. अनेकदा लग्न, जोडीदार या सगळ्याबद्दल आपल्या काय अपेक्षा आहेत हा विचारही केला जात नाही, मग त्याविषयी घरच्यांशी संवाद हा दूरच राहिला. या चित्रपटात प्रशांतची होणारी बायको कोमल लग्नानंतर आपल्याला काय करायचं आहे, याबद्दल स्पष्टता बाळगून आहे. लैंगिक संबंधांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक बाबीतली आपली भूमिका काय आहे हे नवऱ्याला सांगण्याबद्दल ती आग्रही आहे. आधुनिकता फक्त या कुटुंबाच्या दिसण्यातच नाही तर त्यातील पात्रांच्या विचारसरणीतही दिग्दर्शकाने दाखवली आहे. विशेषत: या चित्रपटातील जवळपास सगळ्याच स्त्री व्यक्तिरेखा भिन्न स्वभावाच्या पण टोकदार व्यक्तिमत्त्व असलेल्या आहेत. त्यांच्या असण्यातून हे बदल सहजतेने आपल्यापर्यंत पोहोचतात. कुटुंबातील विरत चाललेला संवाद हा विषय कथेच्या केंद्रस्थानी आहे, तो रंगवताना आई-मुलांचे नाते, वडील-मुलांच्या नात्यातील विसंवाद, पती-पत्नींमधला आवश्यक संवाद, कुठल्यातरी भूतकाळाचं ओझं मनावर घेऊन घरातल्यांशी फटकून वागणारी मुलं असे नात्यांचे कित्येक पदर कथेच्या ओघात सहजपणे गुंफले गेले आहेत. या चित्रपटात लैंगिक शिक्षणाचा भागही तितकाच महत्त्वाचा आहे. या विषयावर घराघरांत मोकळेपणाने संवाद व्हायला हवा, हे या कथेतून दिग्दर्शकाने अधोरेखित केलं आहे, पण त्या विषयाची मांडणी ही फार वरवरची आहे. किमान अशा अवघड विषयांवरचे संवाद हे घराघरांत सहजतेने व्हायला हवेत, ही गरज तरी यातून व्यक्त झाली आहे.

चित्रपटातील कलाकारांची निवडही वेगळी आहे. विशेषत: आईच्या भूमिकेत निवेदिता सराफ यांच्या निवडीने वेगळेपणा आला आहे. सोशिकपणापलीकडे स्त्रीच्या अंतरंगातील अनेक छटा, खट्याळपणाची जोड देत त्यांनी आईची भूमिका सुंदर केली आहे. क्षिती जोगने साकारलेली तायडी सगळ्याच अर्थाने कमाल आहे. सिद्धार्थ चांदेकरचा किरण त्याच्या आजवरच्या समंजस व्यक्तिरेखांपेक्षा वेगळा आणि देखणा आहे. अमेय वाघनेही सोनूच्या भूमिकेत धमाल आणली आहे. जबाबदारीने वागणारा, लहान असूनही कोणी समजून घेत नाही म्हणून खंतावणारा, भरभरून जगू पाहणारा सोनू त्याच्या मुख्य विषयासह अमेयने अप्रतिम रंगवला आहे.

राजसीने साकारलेली कोमल, मितालीची माधुरी आणि मंजूचं इरसाल पात्रही लक्ष वेधून घेतं. राजन भिसे यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या मोजक्या प्रसंगातून वडिलांचा आदरयुक्त धाक जाणवून दिला आहे. वडील आणि लेकाला एकत्र आणणारा प्रसंग नकळत डोळ्यात पाणी आणतो. सिद्धार्थ आणि राजन भिसे दोघांनीही सहज अभिनयाने हा प्रसंग जिवंत केला आहे. या सगळ्या गंभीर पात्रांच्या गर्दीत हरीश दुधाडे यांनी साकारलेले जिजू धमाल आणतात. या चित्रपटातलं घर हेसुद्धा महत्त्वाचा भाग आहे, विशेषत: घराचा मुख्य दरवाजा उघडताच दिसणारी शिवाजी महाराजांची तसबीर, स्वयंपाकघर, वाड्यातली मधली जागा सगळ्याचा सुरेख वापर करून घेतला आहे. चित्रपटातली वेशभूषाही तितकीच अनुरूप अशी… आई, तायडीच्या साड्या, प्रशांत आणि किरणच्या कपड्यांचे रंग, स्टाइल सगळ्याचा बारकाईने विचार केल्याचं जाणवतं. चित्रपटातील सगळी गाणी अर्थपूर्ण आणि श्रवणीय झाली आहेत. गाण्यांचं चित्रणही उत्तम जमून आलं आहे. एकंदरीत या सगळ्या जमून आलेल्या गोष्टींच्या जोरावर दाभाडे कुटुंबाने फसक्लास मनोरंजन केलं आहे.

फसक्लास दाभाडे

दिग्दर्शक हेमंत ढोमे

कलाकार – क्षिती जोग, सिध्दार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, राजन भिसे, उषा नाडकर्णी, मिताली मयेकर, राजसी भावे, हरीश दुधाडे.

Story img Loader