राजू, बाबूराव आणि श्याम या तिघांची धम्माल मस्ती, मनोरंजन आणि कॉमेडीनं ठासून भरलेला ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग कधी येतोय याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. गेल्या तीन वर्षांपासून ‘हेरा फेरी ३’ येतोय अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या. मात्र आता दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी ‘हेरा फेरी ३’ येणार असल्याचं मान्य केलं आहे.
परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी यांचा हेरा फेरी सुपरहिट चित्रपट ठरला होता. त्यानंतर हेरा फेरी २ देखील आला. हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. त्यानंतर अनेक प्रेक्षकांनी ‘हेरा फेरी ३’ काढण्याची मागणी केली होती. २०१६ पासून हेरा फेरी ३ येतोय अशा चर्चा होत्या. अखेर दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी ‘हेरा फेरी ३’ येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या चित्रपटात राजू, बाबूराव आणि श्याम हेच त्रिकूट पहायला मिळणार असल्याचंही ते म्हणाले.
यापूर्वी अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसतील असा चर्चा होत्या . मात्र परेश रावल, अक्षय कुमार, सुनील शेट्टी हेच त्रिकूट ‘हेरा फेरी ३’ मध्येही पाहायला मिळणार असं इंद्र म्हणाले. या वर्षाअखेर चित्रीकरणाला सुरूवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे असंही ते एका मुलाखतीत म्हणाले.