वेगवेगळ्या विषयांवर आधारित हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होत आहेत. मात्र या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ ही तर ताजी उदाहरणं आहेत. आता शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट बॉयकॉट करावा असा नवा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु झाला आहे. यातच भर म्हणजे दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) चित्रपट. ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटही बॉयकॉट करावा असं सातत्याने नेटकरी म्हणत आहेत.
आणखी वाचा – “त्याक्षणी डोळ्यात पाणी आलं अन्…” कौतुक करत अमिताभ बच्चन जेव्हा समीर चौगुलेच्या पाया पडले
आता याबाबतच करणला चिंता वाटत आहे. १५ ऑगस्टला ‘ब्रम्हास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त करणने खास पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्याने अयानचं आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं आहे. पण त्याचबरोबरीने ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा त्याने यामध्ये उल्लेख केला आहे.
करण म्हणाला, “मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या दोन जुळ्या मुलांची जितकी काळजी वाटते तितकीच तुझी देखील वाटते. मला माहित आहे की तू ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी संपूर्ण एक दशक काम केलं आहेस. मी कोणत्याच व्यक्तीला तुझ्यासारखं काम करताना पाहिलं नाही.”
आणखी वाचा – आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट
“९ सप्टेंबरला काय होईल हे याक्षणी सांगता येणार नाही. पण तुझी मेहनत आणि काम यामुळे तू आधीच सगळं काही जिंकलं आहेस. तू फक्त भरारी घे. यश प्राप्त कर. स्वप्न तेव्हाच खरं होतं जेव्हा तुम्ही त्यावर विश्वास ठेवता. आणि तू प्रत्येक स्वप्न खरं करतोस हे मला माहित आहे.” असंही करण म्हणाला. करण जोहरचा ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहामध्ये दाखल होईल. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहेत.