अनुभवसंपन्न कलाकारांबरोबर केलेला चित्रपट गाजल्यानंतर संपूर्णपणे नवीन तरुण कलाकारांना घेऊन चित्रपट करणं हे धाडसच म्हणायला हवं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चर्चेचा विषय ठरलेल्या सूरज चव्हाणचं व्यक्तिमत्व, त्याचं वागणं-बोलणं पाहून दिग्दर्शक केदार शिंदेंना त्यांच्या चित्रपटासाठीची एक संधी दिसली. त्यांनी ती घेतली आणि पूर्णपणे नवीन कलाकारांच्या जोरावर ‘झापुक झुपूक’ मनोरंजनाचा प्रयोग केला.‘झापुक झुपूक’ची कथामांडणी करताना सूरज चव्हाणचं व्यक्तिमत्व, त्याची वैशिष्ट्यं डोळ्यासमोर ठेवून केदार शिंदे यांनी यात सूरज नावानेच व्यक्तिरेखा उभी केली आहे. जगाचं व्यावहारिक शहाणपण समजू न शकणारा सूरज त्याच्या बालदोस्तांचा सुपरहिरो आहे. तो कसा? याचं उत्तर चित्रपटात शोधलेलं बरं… तर रंगरूपाने साधारण असलेला, अशिक्षित, सूरजवीरच्या गोष्टी रंगवून सांगणारा, चमकदार ‘डायलॉग’बाजी करणाऱ्या सूरजची गोंधळी व्यक्तिरेखा मध्यवर्ती ठेवून त्याच्याभोवतीने इतर व्यक्तिरेखांची गुंफण करण्यात आली आहे.

परदेशात शिकून आलेली साध्यासरळ स्वभावाच्या आणि गोड चेहऱ्याच्या नारायणीला पाहून सूरजच्या मनात नवी परीकथा उमलायला सुरुवात होते. नारायणीचा भूतकाळ, वर्तमानात सूरजशी पडलेली गाठ आणि तिच्या दोन्ही काळातील कुठल्याच गोष्टींची माहिती नसलेला, आपल्याच परीकथेत रमलेल्या सूरजच्या गैरसमजातून उभी राहिलेली चुकांची विनोदी मालिका अशापध्दतीची मांडणी करत लेखक – दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘झापुक झुपूक’ची कथा फुलवली आहे.

विनोदी चित्रपटांची मांडणी ही केदार शिंदे यांची खासियत आहे. सुरुवातीच्या काळातील ‘जत्रा’, ‘गलगले निघाले’ असे काही त्यांचे चित्रपट पाहिले तर त्या त्या कलाकाराची खासियत ओळखून त्या अनुषंगाने व्यक्तिरेखा आणि कथानक चपखल विनोदी मांडणीत बसवण्याची त्यांची शैली जुनी आहे. इथे मात्र हा खेळ त्यांनी पूर्णपणे नवीन कलाकारांना घेऊन केलेला आहे.

‘झापुक झुपूक’ या चित्रपटात नारायणीच्या वडिलांच्या भूमिकेतील अभिनेता मिलिंद गवळी आणि मुख्याध्यापक जांभळे यांच्या भूमिकेतील पुष्कराज चिरपुटकर ही दोन नावं वगळता बाकी सगळीच कलाकार मंडळी नवीन आहेत. जुई भागवतचा एक चित्रपट याआधी प्रदर्शित झाला असला, तरी तुलनेने तिचा चेहरा चित्रपटसृष्टीला नवीनच आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिन्यांवर वेगवेगळ्या मालिकांमधून गाजलेले इंद्रनील कामत, पायल जाधव या दोघांसह खलनायकी भूमिकेत असलेला हेमंत फरांदे हे सगळे कलाकार नवीन आहेत. याशिवाय, सूरजची म्हणून बालदोस्तांची जी गँग आहे ते सगळे बालकलाकारही नवीन आहेत. त्यामुळे एक प्रकारचा ताजेपणा या चित्रपटात आहे. काहीशी परीकथा पद्धतीची सुरुवात करत चित्रपट सूरज, नारायणी आणि शेखर या तिघांची कथा गुंफत जातो. जोपर्यंत गोंधळाची मालिका सुरू असते तोवर चित्रपट रंजन करत राहतो.

एका क्षणाला मात्र अगदी हिंदी चित्रपटांच्या यशस्वी साच्याप्रमाणे नायक-नायिका, तिला विरोध करणारे नायिकेचे वडील, सत्ता बळकावण्यासाठी आसूसलेली सावत्र आई आणि तिचा भाचा… मग त्याची दांडगाई अशा उड्या चित्रपट मारत राहतो. त्यातली गंमत कमी होते आणि मग नेमकं प्रेमाच्या गोष्टीत कोण खर्ची पडतं हे प्रेक्षकांना आधीच कळलेलं असल्याने तो कसा खर्ची पडतो, इथपतच ती उत्सूकता राहते.

सुरुवातीला उभा राहिलेला विनोदी डोलारा कथा पुढे जाते तशी पार कोसळून गेला आहे. त्यातल्या त्यात पुष्कराज वगळता विनोदी अभिनयाची जाण फारशी कोणाला नाही. आणि सूरजच्या व्यक्तिरेखेलाही मर्यादा आहेत. तो काही विनोदी अभिनेता नाही किंवा विनोदबुध्दी उत्तम असलेला कलाकार नाही. त्यामुळे मधून मधून येणारे चमकदार डायलॉग आणि काही निर्णायक प्रसंगांमध्ये त्याने दाखवलेली समज वगळता सूरजचं नवं काही चित्रपटात फारसं पाहायला मिळत नाही. त्या तुलनेत जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव आणि हेमंत फरांदे या चौघांनी आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. त्यामुळे अर्धी प्रेमकथा, थोडं ‘सैराट’ वळण, थोडा विनोद असा हा मनोरंजनाचा ‘झापुक झुपूक’ प्रयोग काहीसा अर्धवटच पडद्यावर रंगला आहे, असं वाटत राहतं.

झापुक झुपूक

दिग्दर्शक – केदार शिंदे

कलाकार – सूरज चव्हाण, जुई भागवत, इंद्रनील कामत, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, हेमंत फरांदे, दिपाली पानसरे.