मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पत्नी बेला शिंदेबरोबरच्या सेलिब्रेशनचा एक फोटो पोस्ट केला आहे. याबरोबर त्याने एक खास कॅप्शन दिली आहे. त्यात त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

“वाढदिवस आज जीचा आहे ती.. माझं सर्वस्व आहे. बेला शिंदे आयुष्यातले अनेक चढउतार तीच्या सोबत मी अनुभवले आणि अनुभवतोय. मी नाटक सिरीयल सिनेमा या तीनही क्षेत्रात जे काम करू शकलो ते तीच्या भक्कम पाठिंबा असल्यानेच. कारण एका ठिकाणी स्थीरावण्याच्या आत मी दुसऱ्या मिडीयम मध्ये उडी मारली. पण तीने कधी हू का चू केलं नाही. पैसा येतो आणि तोही स्थीरावण्याआधी त्याला सतरा पारंब्या फुटतात. पण ही मात्र नेटाने पाठीशी. ही आणि स्वामी नसते तर मी नक्कीच नसतो. २०२३ ५०वर्षाची झाली.. तुमच्या साक्षीने वचन देतो.. आता यापुढे तीच्या ओटीत खुप काही पडेल असंच काम करणार. श्री स्वामी समर्थ”, असे त्यांनी या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

तर केदार शिंदेंची मुलगी सना शिंदे हिने देखील आईसाठी खास पोस्ट केली आहे. तिने तिच्या आईबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर ती म्हणाली, माझी खास मैत्रीण, माझं प्रेम, माझं जीवन, माझी आई… ५० व्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा. तुझ्या विचारापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते, असे सना शिंदेने म्हटलं आहे.

दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.