मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक नाव म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे. केदार शिंदे हे महाराष्ट्रातील घराघरात ओळखले जाणारे नाव आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. आजोबांचा वसा सांभाळत केदार शिंदे यांनी मराठी नाट्यभूमी, मालिका विश्व आणि सिनेमा क्षेत्र अशा तिन्ही माध्यमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटाचे नावं ‘महाराष्ट्र शाहीर’ असे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांचे आजोबा म्हणजे शाहिर साबळे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोत बाळासाहेब ठाकरे, शाहीर साबळे दिसत आहे. त्यांनी शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त केदार शिंदे यांनी काही आठवणी ताज्या केल्या आहेत. शाहीर साबळे यांच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी याबाबत शेअर केलेली ही पोस्ट केदार शिंदेंनी पुन्हा शेअर केली आहे.
केदार शिंदेंची इन्स्टाग्राम पोस्ट
“आज शिवसेनेचा स्थापना दिवस…जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…ठाकरेकाका ( बाळासाहेब ठाकरे ) यांच बाबांना भेटायला आमच्या घरी येणं…बाबांच मातोश्रीवर वरचेवर जाणं…फोनवरुनही सतत चर्चा करणं..महाराष्ट्रभर आमच्या गाडीने दोघांनीच केलेला दौरा…पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या मोठमोठ्या नेत्यांच्या दहशतीला न जूमानता बाबांनी ठाकरेकाकांच्या ठीकठीकाणी भरवलेल्या सभा…शिवसेनेचा विचार ठामपणे तरुणांपुढे यावा म्हणून निर्माण केलेलं “आंधळं दळतयं ” मुक्तनाट्य…जागृत झालेल्या मराठी तरुणांनी परप्रांतीयांविरुध्द पेटवलेली पहीली दंगल…बाबांचे आणि ठाकरे काकांचे ट्याप होणारं फोन संभाषण…
दंगलीनंतर एका प्रसीध्द इंग्रजी दैनीकाने बाबांचा भलामोठा फोटो वर्तमानपत्रात छापून ” बाळासाहेबांना गुमराह करणारा हाच तो रक्त पीपासू माणूस ” म्हणून केलेली बाबांची नीर्भत्सना…शिवसेनेने राजकारणात पडू नये म्हणून बाबांनी केलेला आटापीटा…ऐशी टक्के समाजकारण आणि वीसटक्के राजकारण हे ब्रीद असलेल्या शिवसेनेच राजकारणातच सक्रीय होणं आणि बाबांच शिवसेनेपासून दूर होणं…आज हे सर्व आठवतय…शेवटपर्यंत शिवसेनेलाच मत देणारे बाबा आणि शेवटपर्यंत साबळे कुटूंबावर प्रेम करणारे ठाकरेकाकाही आठवतायत…पण खंत एकच आहे की शिवसेनेचा इतिहास लीहीला जाईल तेव्हा त्यात बाबांच्या योगदानाचा उल्लेख नसेल…मात्र बाबांना श्रध्दाजली वाहाताना उध्दव ठाकरे याचा उल्लेख करायला विसरले नाहीत हे ही कमी नाही…आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्या कुटुंबाबरोबर तसच स्नेहपुर्ण नात टिकवून ठेवलय…शिवसेना शतायु होवो…मराठी आणि शिवसेना हे समीकरण आबाधीत राहो…..”जय महाराष्ट्र”, अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित, केदार शिंदे प्रॉडक्शन्स प्रस्तुत व बेला केदार शिंदे निर्मित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात शाहिरांच्या मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी झळकणार आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद प्रतिमा कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. या चित्रपटातील संगीत महाराष्ट्राचे लाडके गायक अजय- अतुल यांनी दिले आहे. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती.