सिनेसृष्टीत नाव कमवावं, असं अनेक तरुणांना वाटतं. त्यासाठी दरवर्षी अनेक नवखे कलाकार मनोरंजन विश्वात काम शोधतात. त्यातील अनेक कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून लाखोंचा चाहता वर्ग कमावत असतात. अशात प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतंच नवख्या कलाकारांविषयीचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

महेश मांजरेकर यांनी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयासह दिग्दर्शनानं मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट तिकीट खिडकीवर दमदार कामगिरी करतो. महेश मांजरेकर यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा होताच काहीतरी नवीन पाहायला मिळणार, असं प्रत्येकाला वाटतं. अशात त्यांनी नुकतंच सिनेविश्वातील नवख्या कलाकारांविषयी त्यांना काय वाटतं यावर मत व्यक्त केलं आहे.

महेश मांजरेकर यांनी मटा मनोरंजनला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी नवीन कलाकार आणि सिनेविश्वात अन्य कामे करणाऱ्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “आजची जी मुलं आहेत, ती आधीच तयार होऊन आलेली असतात. म्हणजे सिनेविश्वात आता जी मुलं येतात, ती अशीच येत नाहीत. ती आधीच बरंच काही शिकून आलेली असतात. मला त्यांचं नेहमीच कौतुक वाटतं. यात फक्त कलाकारच नाही, तर टेक्निकल गोष्टींमध्ये काम करणारी मुलंही आता आधीच अनेक गोष्टी शिकून येतात.”

माझी त्यांच्याशी स्पर्धा आहे…”

मुलाखतीत महेश मांजरेकर पुढे म्हणाले, “मी नेहमीच अशा मुलांचा शोध घेत असतो. माझी त्यांच्याशी स्पर्धा आहे. आणि हे फॅक्ट आहे. कारण- ती आधीच तयार होऊन आलेली असतात. मराठीमध्ये फक्त हा हीरो आहे म्हणून कोणी चित्रपट पाहण्यासाठी येत नाही. मराठीमध्ये विषयाला जास्त महत्त्व आहे.”

‘सैराट’मधील कलाकार नवीनच होते…

नवख्या कलाकारांना घेऊन चाललेल्या चित्रपटांचा उल्लेख करताना महेश मांजरेकर यांनी पुढे ‘सैराट’ चित्रपटाचं नाव घेतलं. ते म्हणाले, “मराठी सिनेविश्वात सर्वांत जास्त चाललेला चित्रपट म्हणजे ‘सैराट’. त्यामध्ये सर्व नवीन कलाकार होते. ‘बाई पण भारी देवा’मध्ये असलेल्या सर्व महिला कलाकारांनी याआधी अनेक ठिकाणी कामे केली आहेत. पण त्याच ठरावीक महिला कलाकारांना एकत्र आणलं, तर त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे मराठीमध्ये नेहमी तुम्ही कोणता विषय निवडता याला महत्त्व आहे. तसेच प्रेक्षकांना नवखे कलाकार आवडतात.”

मला नवीन लोकांबरोबर काम करायला आता जास्त आवडेल. त्यामुळे मी स्वत: नवीन विशेष कौशल्य असलेली मुलं शोधत आहे. तेच तेच कलाकार चित्रपटात असणं चुकीचं नाही, त्यांच्या कामाबद्दल काहीच शंका नाही. मात्र, नवीन फ्रेश अप्रोच असणं आता फार गरजेचं आहे.” असं महेश मांजरेकर यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.

Story img Loader