मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून शरद पोंक्षे यांना ओळखले जाते. नुकतंच शरद पोंक्षे यांना त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. शरद पोंक्षेबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यालाही हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र यावर मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी आक्षेप घेतला आहे. या कलाकारांनी हिंदुत्वासाठी असं काय केलं ज्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. नुकतंच त्यांनी शरद पोंक्षे आणि स्वप्नील जोशीवर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. शरद पोंक्षे आणि स्वप्नील जोशी यांना त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. त्यावरुन त्यांनी या पोस्टमध्ये टीका केली आहे.
आणखी वाचा : “सातत्यानं सावरकर व्याख्यानं देतोय पण…” शरद पोंक्षेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

महेश टिळेकर यांची पोस्ट

‘अभिनंदन पोंक्षे, जोशी. नुकत्याच एका संस्थेने जेष्ठ आणि विद्वान अभिनेते शरद पोंक्षे आणि बाल कलाकार ते हिरो असं प्रचंड यश मिळवणारा सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी यांना हिदुत्व आणि हिंदू धर्मासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरव केला. यामुळे या कलाकारांचा अभिमान वाटून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा इतकं कोणतं महान कार्य या कलाकारांनी हिंदुत्वासाठी केलं आहे जे या आधी कुठल्याच कलाकारांना जमलं नाही. कलाकाराला त्याच्या अभिनयासाठी किंवा त्याने समाजासाठी काहीतरी योगदान दिलं म्हणून त्याचा सन्मान, गौरव होतो हे आत्तापर्यंत पाहण्यात आलं होतं. पण कलाकाराला धर्मासाठी म्हणून पुरस्कार देण्यात येतोय हे मी पहिल्यांदाच पाहतोय.’

‘आत्तापर्यंत मी अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांकडून कलाकाराला आणि कलेला धर्म नसतो हे त्यांचे विचार मांडताना पाहिलं आहे. पण आज पोंक्षे, जोशी यांना धर्मासाठी म्हणून देण्यात आलेल्या पुरस्कारामुळे त्यांनी हिंदुत्वासाठी किती आणि कशा पद्धतीनं भरीव काम केलं आहे हे आता जगासमोर आलं तर त्यांच्यामुळे अनेकांना दिशा, प्रेरणा मिळेल. आपणही काय केलं पाहिजे हे पोंक्षेसारख्या थोर विचारवंत कलाकाराकडून आजच्या पिढीला शिकता येईल.

पण हिंदू नसूनही लोक, समाज काय म्हणेल याची पर्वा न करता हिंदू पद्धतीने स्वतःच्या नवीन ऑफिसमध्ये पूजाविधी करणारा आमिर खान असो किंवा वैष्णोदेवीसारख्या हिंदू मंदिरात जाऊन नतमस्तक होणारा शाहरुख खान असो, या कलाकारांनी स्वतःच्या प्रोडक्शन हाउसमध्ये अनेक हिंदूंना जॉब देऊन नव्या कलाकारांना संधी दिली आहे. या कलाकारांना कोणती हिंदू संस्था पुरस्कार देईल का?’ असे महेश टिळेकर यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महेश टिळेकर पोस्ट

आणखी वाचा : “मराठी प्रेक्षक गेले कुठे?”, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांची ‘ती’ पोस्ट व्हायरल

महेश टिळेकरांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले. तर काहींनी त्यांचे समर्थन केले होते. पण या पोस्टवरुन सुरु झालेल्या ट्रोलिंगमुळे त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे. मात्र त्यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director mahesh tilekar angry after sharad ponkshe swapnil joshi got award for hindutva facebook post nrp