आपल्या सशक्त कलाकृतींतून वेगळा ठसा उमटविणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे आणि मकरंद शशिमधू माने ही दोन नावं ठळकपणे समोर येतात. रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब, समाजातील वास्तव, सोबत मानवी भावभावना आपल्या चित्रपटांमधून दाखवताना आपल्या मातीशी असलेली नाळ या दोघांनी कायम जपली. चित्रपटसृष्टीतील हे दोन मातबर दिग्दर्शक आता ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाप आणि लेकाच्या नात्याचं भावनिक विश्व रंगवणाऱ्या दिग्दर्शक मकरंद माने यांचा बापल्योकह्ण हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. तर, ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘बापल्योक’ या चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांनी लिहिली आहे. तर पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांनी लिहिले आहेत. गुरू ठाकूर आणि वैभव देशमुख यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली असून विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. तर अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. चित्रपटाविषयी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, ‘सरणारी वर्ष आणि वाढणारा सहवास यांच्या साथीने नाती मुरत जातात. अर्थात, या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो. आजवर बाप लेकाचा प्रवास तेवढय़ा ताकदीने चित्रपटातून मांडला गेलेला नाही. मकरंद याला हा प्रवास मांडावासा वाटला. ही गोष्ट मला भावली आणि मी चित्रपटासाठी पुढाकार घेतला’. ‘तिरक्या रेघेवरच असतं बापल्योकाचं नातं. ताणलं तर आयुष्यभराचं ताणतं, अन् घावलं तर?..तेच हुडकण्यासाठी आमी समदी एकत्र आलोय’, असे दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director nagraj manjule and makarand mane team up for bapalyok amy
Show comments