प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे हे कायमच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. नागराज मंजुळे यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘झुंड’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहे. यावेळी त्यांनी चित्रपट, भाषा, सौंदर्य याबद्दल भाष्य केले.
दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांनी नुकतंच ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांना शुद्ध भाषेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “शुद्ध असं काही नसतं. शुद्ध ही संकल्पनाच अत्यंत फालतू आहे. माझी भाषा ही माझी आहे. त्यामुळे शुद्ध, अशुद्ध असं काही नसतं. मुळात जगभरात कुठंही अशुद्ध भाषा हा प्रकारच नसतो. अमेरिकी भाषातज्ज्ञ नोम चॉम्स्की यांच्या शब्दांत सांगायचं तर भाषेचा हेतू हा शुद्ध ठरवणं, असा नसतो, तर संवाद साधणं असतो.”
आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटासाठी मी ही उत्सुक पण…”, दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी दिले स्पष्टीकरण
“लहानपणी मलाही माझ्या दिसण्यावरून न्यूनगंड होता. पण आता तो नाहीसा झाला आहे. सौंदर्य ही खूप मोठी गोष्ट आहे. सौंदर्याची व्याख्या खरं तर मला अलीकडंच कळू लागली आहे. गोरेपणा म्हणजे सौंदर्य नव्हे. साधी-साधी दिसणारी माणसंही मला सुंदर वाटतात. काहीच काम न करणाऱ्या हातांपेक्षा राबणारे हात मला सुंदर वाटतात”, असेही नागराज मंजुळेंनी सांगितले.
आणखी वाचा : जगातील सर्वात सुंदर महिला आणि अभिनेत्रीचं निधन, करिश्मा कपूरशी होतं खास कनेक्शन
दरम्यान नागराज मंजुळे हे लवकरच ‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर पोलिस व गुन्हेगार यांच्याभोवती फिरणारी ही चित्रपटाची कथा आहे असं दिसून येत आहे. येत्या मार्च महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे.