‘कल हो ना हो’सारख्या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवणारे हरहुन्नरी दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘वेदा’ चित्रपटापर्यंत अनेक विविध विषय चित्रपट आणि वेब मालिकांच्या माध्यमातून मांडले आहेत. त्यांनी मांडलेल्या विविध विषयांमध्ये देशभक्तीवर आधारित चित्रपट किंवा समाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांचे प्रमाण अधिक आहे. असाच एक रंजक आणि देशाच्या इतिहासात पुन्हा डोकवायला लावणारा विषय त्यांनी आगामी ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या वेब मालिकेतून मांडला आहे. मला ८०० कोटी कमाई करणाऱ्या चित्रपटांपेक्षा उत्तम कलाकृती ठरतील असे चित्रपट करायचे आहेत, हे ठामपणे सांगणारे निखिल अडवाणी कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत, हेही तितकेच आग्रहाने सांगतात.

आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडलेल्या प्रमुख घटना आणि त्या वेळी त्या त्या घटनांमध्ये तत्कालीन नेेते आणि काही प्रमुख मंडळींनी घेतलेल्या भूमिका, त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेले ताणतणाव अशा काही वेगळ्या मुद्द्यांचा परामर्श घेत ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या वेब मालिकेतून भारतीय स्वातंत्र्याची कथा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे. ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी माध्यमावर १५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या वेब मालिकेत सिद्धांत गुप्ता, पवन चोपडा, राजेंद्र चावला, चिराग व्होरा आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी ‘लोकसत्ता’शी गप्पा मारल्या.

हेही वाचा >>>कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…

ऐतिहासिक विषय हाताळताना कलाकारांची निवड आणि त्यांची रंगभूषा, वेशभूषा या गोष्टी अधिक अवघड असतात. तोच अनुभव ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’च्या निमित्ताने पुन्हा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. कलाकारांची निवड करताना आम्ही रंगभूषाकार जगदीश येरे यांनाही सहभागी करून घेतलं होतं, त्यामुळे गोष्टी बऱ्याच सोप्या झाल्या, असंही अडवाणी यांनी स्पष्ट केलं.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते कसे दिसत होते, कसे बोलत होते याची बऱ्यापैकी जाणीव प्रेक्षकांना आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी चेहरेपट्टी, आवाज असणारे कलाकार असणे अतिशय गरजेचे होते. म्हणून त्यांच्या दिसण्याचा आणि त्यांच्या प्रत्येक हावभावाचा विचार करून कलाकारांची निवड केली. उदाहरणच द्यायचं तर पंडित नेहरू यांच्या पात्रासाठी निवड करताना आमचे रंगभूषाकार जगदीश यांनी सरळ नाक असलेल्या अभिनेत्याची निवड करा, कारण नेहरूंचं नाक हे सरळ आणि आकर्षक होतं, असा सल्ला दिला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून कलाकारांची निवड केल्याचं अडवाणी म्हणाले.

झपाटलेपणातून चित्रपटनिर्मिती

चित्रपट वा कुठल्याही कलाकृतीची निर्मिती ही आव्हानात्मकच असते, दरवेळी उत्तम सहकारी लाभल्याशिवाय कोणतीही कलाकृती होऊ शकत नाही. मात्र चित्रपटाच्या निर्मितीसाठी दिग्दर्शकाचं झपाटलेपण अधिक महत्त्वाचं असतं, असं मत त्यांनी मांडलं. ‘दिग्दर्शक हा खरोखरच कलंदर असतो. त्याला डोंगराचा एक कडा दिसत असतो. तो त्या कड्यावर त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन जातो. आणि पॅराशूट उघडेल या एका आश्वासनावर खाली उडी मारून ते अभूतपूर्व अनुभव घ्यायला लावतो. चित्रपट हा त्याच्या अशा झपाटलेपणातून जन्माला येतो. आपली कलाकृती प्रेक्षकांना आवडणारच, या त्याच्या विश्वासावर २०० ते ३०० लोक काम करत असतात’, अशा शब्दांत अडवाणी यांनी चित्रपट निर्मितीत दिग्दर्शकाची काय भूमिका असते हे उलगडून सांगितलं.

हेही वाचा >>>७ वर्षांच्या मुलाने धनंजय पोवारचं हातावर काढलं चित्र, आई डीपीला फोटो पाठवून म्हणाली, “दादा काय जादू केली…”

कोट्यवधींच्या कमाईची शर्यत

कलाकृती म्हणून चित्रपटांकडे पाहिलं जाईल तेव्हा कोट्यवधींच्या कमाईची शर्यत थांबेल, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. ‘कलेचं रूपांतर जेव्हापासून ५००-८०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा चित्रपट म्हणून व्हायला लागलं तेव्हापासून त्यातली कला हरवत चालली आहे. आपण प्रेक्षकांना काय दाखवतो आहोत, यापेक्षा तो चित्रपट किती कमाई करेल याचा विचार अधिक केला जातो. यश चोप्रा, मनमोहन देसाई, बासू भट्टाचार्य, हृषिकेश मुखर्जी अशा विविध शैलीदार चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांनीही व्यावसायिक चित्रपट केले आहेत, पण त्यांच्या चित्रपटात काहीतरी नवीन असायचं. त्यांनी केलेले चित्रपट हे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

ज्या दिवशी आपण चित्रपटांकडे व्यवसायाच्या दृष्टीने पाहणं थांबवू तेव्हाच ही कोट्यवधींच्या कमाईसाठी सुरू असलेली चढाओढ थांबेल’, असं ते म्हणतात. जगभरात कुठेही जेव्हा जेव्हा समाजातील तणाव वाढला तेव्हा कला-संस्कृतीला अधिक बहर चढला आहे. जागतिक युद्ध असो वा क्रांती असो… त्याच काळात कलेतून सामाजिक प्रबोधन मोठ्या प्रमाणावर झालं हे इतिहास सांगतो. त्यामुळे आज आर्थिक यशाच्या मागे सगळे धावत असले तरी कलात्मक चित्रपटांची भूक आणि त्याच्या निर्मितीची आस कधीच लोप पावणार नाही, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

फ्रीडम अॅट मिडनाइट’ आता का गरजेची?

आत्ताच्या या काळात देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं याची कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणणं गरजेचं वाटलं असं सांगत त्यामागची त्यांची भूमिका निखिल यांनी स्पष्ट केली. ‘आपल्या आजूबाजूला असलेली तरुण पिढी सध्या फार विचित्र आशय पाहत असते. त्यांच्या शाळांमध्ये इतिहास शिकवला जातो, पण सध्या अनेक पालक त्यांच्या पाल्यांना आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये घालत असल्याने तिथे भारतीय इतिहास फार खोलात जाऊन शिकवला जात नाही. त्यामुळे त्यांना भारताला स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळाले, त्या वेळी कार्यरत असलेल्या नेत्यांवर किती मोठी जबाबदारी होती, ती त्यांनी कशी पेलली आणि त्याचे काय पडसाद उमटले? याची थोडीफार माहिती या वेब मालिकेतून मिळाली तर पुढे त्यांना त्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण होईल. ज्यांना आपला इतिहास माहिती आहे त्यांना एक वेगळा पैलू समजून घेता येईल, या दोन्ही उद्देशाने ही वेब मालिका गरजेची वाटली’, असं त्यांनी सांगितलं.

Story img Loader