रसिका शिंदे
‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती लाकडाला पोखरणारी कीड. अमाप नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला झी स्टुडिओची निर्मिती असलेल्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘वाळवी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना चित्रपटाच्या निर्मात्या आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘काही वर्षांपासून माझ्या डोळय़ांसमोर एक चित्र उभं राहात होतं, ज्यात नवरा-बायको एकमेकांसमोर आपापल्या डोक्याला बंदूक लावून उभे आहेत, पण त्या पलीकडे मला काही दिसत नव्हतं. मग मी परेश मोकाशी यांच्याशी याबद्दल बोलले आणि मग या गोष्टीचा विचार करता करता ती घडत गेली. यातली पात्रं कशी असतील, थरार कसा उलगडत जाईल याचा विचार करत ‘वाळवी’ हा चित्रपट लिहिला गेला.’’ परेश मोकाशी यांचा चित्रपट म्हटला की वेगळय़ा विषयाचा मोठय़ा पडद्यावर उलगडा होणार हे आता प्रेक्षकांनीही गृहीत धरलं आहे. याही चित्रपटात ते वेगळेपण आहे हे मान्य करताना ‘वाळवी’मध्ये एक नव्हे आठ ते दहा उत्कर्षिबदू आहेत, वळणं आहेत, असं दिग्दर्शक परेश मोकाशी सांगतात. रहस्य आणि हास्य याचे मिश्रण असलेला ‘रहास्यपट’, अशी नवी व्याख्या त्यांनी केली आहे. रहस्याबरोबरच विनोदी अंगाने देखील नवरा-बायकोच्या नात्यातील वेगळेपण मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘रहास्यपट’ आपल्याकडे फार कमी प्रमाणात येतात, असे सांगतानाच मराठीत प्रेक्षकांनी सहकुटुंब पाहावा असा हा रहास्यपट असल्याचे अभिनेत्री अनिता दाते सांगते. नवरा-बायकोमधील भांडणं कधीतरी विनोदाकडेही झुकताना आपण अनुभवतो. त्याच पद्धतीने प्रासंगिक विनोदनिर्मिती या चित्रपटात दिग्दर्शकाने केली असल्याचे ती म्हणते. मराठीत आशय-विषयांच्या बाबतीत वैविध्य असलेले चित्रपट देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत असतात. परेश मोकाशी हेही अशाच दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून मला चित्रपट सुचतो, असे सांगणाऱ्या मोकाशी यांनी दादासाहेब फाळके यांचे चरित्र वाचल्यानंतर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट सुचला, तर मधुगंधा कुलकर्णी यांच्या बालपणीची कथा ऐकल्यावर ‘एलिझाबेथ एकादशी’ची कल्पना सुचल्याचे सांगितले. नवरा-बायकोमधील वाढती भांडणं मित्र-मैत्रिणंकडून कानावर पडली आणि ‘चि. व चि.सौ.का’ घडला. रंगाने काळय़ा असणाऱ्या मुली आणि टक्कल पडलेली मुलं यांना जोडीदार मिळत नाहीत किंवा त्यांची अवहेलना होते ही सत्य परिस्थिती पाहून ‘खटला बिटला’ हा चित्रपट सुचला होता, अशी प्रत्येक चित्रपटामागची गोष्ट मोकाशी यांनी सांगितली. ‘वाळवी’ या चित्रपटात स्वप्निल जोशी, अनिता दाते, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चार कलाकारांनीच या भूमिका साकाराव्यात, ही कथेची मागणी होती असं मोकाशी सांगतात. या चार पात्रांसोबतच ‘वाळवी’ हे पाचवे आणि अतिमहत्त्वाचे पात्र यात आहे. संपूर्ण चित्रपटात ही वाळवी धमाल उडवून देते आणि शेवटी नेमकी वाळवी काय आहे आणि ती कशाला लागली आहे याचा उलगडा होतो, असेही मोकाशी सांगतात. अनेक वेळा चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाही आणि नंतर तो प्रदर्शित झाल्यावरही आपल्याकडून आपल्या लेखक आणि दिग्दर्शकाने किती सुंदर काम करून घेतलं आहे, याची जाणीव होते. असंच काहीसं या चित्रपटाबाबतीत घडल्याचं अभिनेता सुबोध भावे यांनी सांगितलं. याशिवाय विषयाची माहिती आणि तो मांडण्याचा दृष्टिकोन हा दृढ असलेल्या परेश मोकाशींसोबत काम करण्याची इच्छा होतीच. या चित्रपटानिमित्ताने ती पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. माझ्या आत्तापर्यंतच्या लिखाणापैकी ‘वाळवी’ हे माझं सर्वोत्कृष्ट लिखाण आहे, असं मधुगंधा कुलकर्णी सांगतात. नवरा-बायकोच्या नात्याला लागलेली वाळवी असो किंवा मग इतर कोणत्याही नात्याला लागलेली वाळवी असो, त्यातून आपण काय शिकतो हे महत्त्वाचं आहे, हा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.