विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या कलाकारांवरुन विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नुकतंच या प्रश्नांवर दिग्दर्शक प्रसाद ओक याने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
‘सकाळ’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने ‘चंद्रमुखी’ या चित्रपटासह होणाऱ्या विविध वादांवर स्पष्टीकरण दिले. तू अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे याच कलाकारांची निवड या चित्रपटासाठी का केलीस? त्याचे नेमकं कारण काय? असा प्रश्न प्रसाद ओकला विचारण्यात आला होता.
“मी आणखी चांगली ‘चंद्रमुखी’ साकारली असती…”, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक दावा
यावर उत्तर देताना प्रसाद म्हणाला, “अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे खरंच खूप चांगले कलाकार आहेत. ते नेहमी स्वतःला चित्रपटातील पात्रांमध्ये झोकून देतात. कोणतीही भूमिका असली तरीही ते प्रत्येक भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतात. त्यामुळेच मी त्यांची निवड केली.”
“या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी मला फार सहकार्य केले. या चित्रपटासाठी मी कलाकारांचे वर्कशॉप घेतले होते. अमृताने ८ ते १० महिने या वर्कशॉपमध्ये घालवले. अमृताला चंद्राची भाषा कशी आहे, ती शिकवायची होती. तिला या भूमिकेसाठी वजनही वाढवायला लावलं. तिची देहबोली, हावभाव या सगळ्या गोष्टी मी या वर्कशॉपमध्ये करून घेतल्या. यासाठी अमृताने प्रचंड मेहनत आणि उत्साह दाखवला”, असे प्रसाद ओकने म्हटले.
“तर आदिनाथनेही तितकीच मेहनत करुन दौलत साकारला. यासाठी त्यानेही तितकीच मेहनत घेतली आहे. त्याच्याकडे आधीच २-३ प्रोजेक्ट होते. मात्र चंद्रमुखी या चित्रपटाचे गांभीर्य समजल्यानंतर त्याने त्याच्या इतर प्रोजेक्टच्या तारखा थोड्या पुढे ढकलल्या. त्या दोघांनीही या चित्रपटासाठी पुरेपूर वेळ दिला. त्यांनी या चित्रपटात अतिशय उत्तमरित्या काम केले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाल याबाबत नक्कीच कल्पना येईल”, असेही प्रसादने सांगितले.
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे.