हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे हे हंबीरराव मोहिते यांच्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.
प्रविण तरडे यांनी पुण्यात शिवजयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीमध्ये या चित्रपटाची घोषणा केली. याऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचेच असणार आहे.
हंबीरराव मोहिते हे छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सेनापती होते. त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची वर्णी लागली आहे. मात्र या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ६ जून २०१९ रोजी प्रविण तरडे हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेवरील पडदा दूर सारणार आहेत. सध्या या चित्रपटाचं काम सुरु असून जानेवारी २०२० मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.