आगामी मराठी चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’ हा त्यातील एका गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातील ‘आरारारा’ या गाण्यात खरेखुरे गुन्हेगार झळकल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रतिक्रिया दिली असून गाण्यात कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या चित्रपटातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण अजिबात होत नाही. उलट गुन्हेगारी किती वाईट आहे आणि त्याचा शेवट किती भयानक असतो हेच यातून पाहायला मिळणार आहे. या गाण्यातील अमोल शिंदे हा वातूनडे गावाचा सरपंच आहे. तिथल्या लोकांनी त्याला बिनविरोध निवडून दिलं आहे. त्यांच्यावर कोणता गुन्हा आहे याची मला माहिती नाही. ज्यावेळी पूर्ण चित्रपट लोक पाहतील, तेव्हा मी या लोकांना चित्रपटात का घेतलं याचं उत्तर तुम्हाला मिळेल,’ अशी प्रतिक्रिया प्रवीण तरडेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

गाण्यात झळकलेले अमोल शिंदे, विठ्ठल शेलार हे कुख्यात गुन्हेगार आहेत. अमोल शिंदेवर हत्येच्या आरोपासह दरोडा, घातक शस्त्र बाळगणे यासारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर विठ्ठल शेलारवर प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांचं अपहरण करून त्यांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अमोल शिंदेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खून
दरोडा आणि दंगलीचे गुन्हे दाखल

विठ्ठल शेलारची गुन्हेगारी पार्श्वभूमी

२००९ मध्ये डेक्कन भागात दरोडा
२०१० मध्ये टोळी युद्धातून पिंटू मारणेची हत्या
२०१२ मध्ये प्रतिस्पर्धी टोळीतल्या दोघांचं अपहरण आणि हत्या
२०१३ मध्ये अपहरण, खंडणीची मागणी
मोक्काअंतर्गत पोलिसांची कारवाई

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director pravin tarde reaction on mulshi pattern song controversy