‘टाइमपास’ चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी. ‘टाइमपास’चे पहिले दोन भाग सुपरहिट ठरले. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी तर सोशल मीडियावर प्रचंड हिट ठरत आहेत. ‘टाइमपास ३’ चित्रपटाच्यानिमित्ताने दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते संजय नार्वेकर, अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी रवी जाधव यांनी ‘वाघाची डरकाळी’ या चित्रपटामधील गाण्याबद्दल सांगितलं.
आणखी वाचा – सनी देओल उपचारासाठी अमेरिकेमध्ये दाखल, अभिनेत्याला नेमकं झालंय काय?
‘टाइमपास ३’मधलं ‘वाघाची डरकाळी’ गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला काही दिवसांमध्येच लाखो लोकांनी पसंती दर्शवली. पण गाण्याचे बोल ऐकून “या गाण्याचा आताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही”, “हे गाणं ऐकताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवण झाली” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. याबाबत आता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ
ते म्हणाले, “२०२०मध्ये क्षितिज पटवर्धन याने ‘वाघाची डरकाळी’ गाणं लिहिलं आहे. त्यामुळे याचा आताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. मला जेव्हा जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे तेव्हा तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या घरी आले होते. आता ते मुख्यमंत्री आहेत. पण ठाण्यामधील कोणत्याही व्यक्तीला एखादा पुरस्कार मिळाला की ते त्याच्या घरी जावून त्याची भेट घेतात. हे सत्य आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा मला प्रचंड आनंद आहे.”
रवी जाधव यांच्या मोठा भावाची रिक्षा आहे. ही रिक्षा पाहूनच त्यांना या गाण्याची कल्पना सुचली. आणि आज हे गाणं सोशल मीडियावर सुपरहिट ठरत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे. याद्वारे प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या २९ जुलैला ‘टाइमपास ३’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.