मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील ५२० किलोमीटरच्या नागपूर – शिर्डी टप्प्याचे उद्घाटन काल, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यांच्याबरोबरीने इतर राजकीय मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या महामार्गामुळे मुंबई नागपूर या दोन शहरातील प्रवासाचे अंतर कमी होणार. या प्रकल्पाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तसेच कलाक्षेत्रातूनदेखील याचे कौतुक केले जात आहे.
बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने सुमृद्धी महामार्गाचा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहेच शिवाय एक आवाहनदेखील केले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले आहे, “हा असा एक प्रकल्प ज्याचा आपल्याला अभिमान आहे, मात्र एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की गाडी सुरक्षित आणि जबाबदारीने चालवली पाहिजे.” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मुंबई – नागपूर दरम्यानच्या ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. यादरम्यान महामार्गातील काही टप्प्यांचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ने पाच टप्प्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रकल्पाची वैशिष्टय़े म्हणजे हा महामार्ग १० जिल्हे आणि ३९० गावांना जोडणारा आहे. मुंबई – नागपूर अंतर केवळ आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. वेग मर्यादा ताशी १५० किमी, प्रत्यक्षात ताशी १२० किमीने प्रवास अशी असणार आहे.
दरम्यान रोहित शेट्टी सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या २३ डिसेंबरला त्याचा सर्कस चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्कस’मध्ये रणवीर सिंगबरोबर जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, सिद्धार्थ जाधव, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.