लोकसत्ता प्रतिनिधी
‘सिंघम’, ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’सारखे यशस्वी चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी लवकरच ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणारी वेब मालिका प्रेक्षकांसमोर घेऊन आले आहेत. ही वेब मालिका म्हणजे रोहित शेट्टी आणि त्याचा नवाकोरा पोलीस नायक सिद्धार्थ मल्होत्रा दोघांचेही ‘ओटीटी’ माध्यमावरील पदार्पण ठरली आहे. या मालिकेच्या निमित्ताने माध्यमांसमोर आलेल्या रोहितने या वेब मालिकेविषयी आणि नव्या पोलीस नायकाच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्राची निवड कशी झाली अशा विविध मुद्दय़ांवर मनमोकळय़ा गप्पा मारल्या.
रोहित शेट्टीच्या ‘कॉप युनिव्हर्स’मध्ये आत्तापर्यंत बाजीराव सिंघम, संग्राम भालेराव आणि वीर सूर्यवंशी यांचा धमाका प्रेक्षकांनी अनुभवला आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’मधून दिल्लीच्या कबीर मलिकबरोबर पहिल्यांदाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे पात्रही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साकारली आहे. तिच्याबरोबर विवेक ओबेरॉय आणि श्वेता तिवारी हे कलाकारही या वेबमालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेब मालिका १९ जानेवारी रोजी अमेझॉन प्राइम या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा >>>Video: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचले राज ठाकरे, तर आदित्य ठाकरेंची आई व भावासह हजेरी
‘इंडियन पोलीस फोर्स’ ही वेब मालिका करण्याचा निर्णय कसा घेतला? या प्रश्नाचे उत्तर देताना ‘मी मालिका आणि चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रांत काम केले आहे. आणि मला एक दिग्दर्शक म्हणून सगळय़ा क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. वेब मालिका त्यानंतर ‘स्टॅन्डअप कॉमेडी’ अशा प्रत्येक कला क्षेत्रात काम करायची इच्छा आहे. सतत वेगवेगळय़ा माध्यमातून कथा-मांडणी आणि जॉनरच्या बाबतीत सतत प्रयोग करून पाहण्याचा विचार कायमच माझ्या मनात असतो. प्रयोगशील राहण्याच्या या वृत्तीमुळेच पोलिसांच्या या कथेसाठी वेब मालिकेचे माध्यम पडताळून पाहण्याचा निर्णय घेतला’ असे रोहितने सांगितले. अर्थात ही मालिका करताना चित्रपटासाठी ज्याप्रकारची मोठी अॅक्शन दृश्ये साकारता येतात तशी भव्यदिव्य आणि खर्चीक बांधणी करता येईल का? याबद्दल मी सुरुवातीला साशंक होतो. पण हळूहळू जसं चित्रीकरण करत पुढे गेलो तसतसे आणखी नवीन प्रयोग करण्याची संधी मला या वेब मालिकेमुळे मिळाली, असे त्याने सांगितले.
आत्तापर्यंत या ‘कॉप युनिव्हर्स’मध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश झाला नव्हता. खास या वेब मालिकेसाठी असे नव्हे मात्र एखादी चांगली अभिनेत्री पोलीस अधिकारी म्हणून प्रेक्षकांसमोर यायला हवी हा विचार माझ्या मनात कधीपासून रुंजी घालत होता. पण त्या पद्धतीची कथा हाती येत नव्हती. त्याचबरोबर इतक्या मोठय़ा स्तरावर चांगल्या व्यक्तिरेखा एकत्रित दाखवायच्या तर निर्मिती खर्चाचा आकडाही तितकाच मोठा हवा असतो. या दोन्ही गोष्टी या मालिकेच्या बाबतीत जुळून आल्या असे रोहितने सांगितले. आम्ही जेव्हा या महिला पोलीस अधिकारी पात्राचं लेखन करत होतो तेव्हाच ही भूमिका कोण साकारू शकतो यावर बराच खल केला होता. खूप विचारानंतर ही भूमिका शिल्पा शेट्टी चांगली करू शकेल असे आम्हाला वाटले. एका पोलीस अधिकाऱ्यासाठी आवश्यक देहबोली तिच्याकडे आहे. त्यामुळे तिची या भूमिकेसाठी निवड झाली, असे त्याने सांगितले. रोहितच्या ‘कॉप युनिव्हर्स’मध्ये एक नव्हे तर दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा प्रवेश झाला आहे. ‘सिंघम अगेन’ या रोहितच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणही महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचाही पोस्टर लूक याआधीच प्रदर्शित झाला आहे. मात्र ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाआधीच ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबमालिकेचे लेखन आणि चित्रीकरण पूर्ण झाले. त्यामुळे एकाअर्थी शिल्पा शेट्टी या ‘कॉप युनिव्हर्स’ची पहिली महिला पोलीस अधिकारी ठरली आहे.
‘कॉप युनिव्हर्स’चा देखणा पोलीस
रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार असे एकापेक्षा एक तगडे अभिनेते पोलिसाच्या भूमिकेत यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे ‘इंडियन पोलीस फोर्स’साठी नवा चेहरा निवडताना सिद्धार्थ मल्होत्राची निवड कशी झाली याचाही सविस्तर किस्सा रोहित शेट्टीने सांगितला. सिद्धार्थच्या ‘शेरशहा’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याची ‘शेरशहा’ चित्रपटातील भूमिका आणि ‘मिशन मजनू’ या चित्रपटातील त्याचे काम देखील आवडले होते. त्यामुळे माझ्या पुढील ‘कॉप युनिव्हर्स’मधील भूमिका त्यालाच द्यायची हा माझा निर्णय पक्का झाला होता. आता त्याला यासाठी आणि विशेषत: ही वेब मालिका असल्याने त्यासाठी तयार करणे हे आव्हान होते. मी त्याला जेव्हा या भूमिकेसाठी विचारले तेव्हाच त्याला ही वेब मालिका असणार याची कल्पना दिली. मात्र ही वेब मालिका चित्रपटाइतक्याच भव्य स्तरावर बनवण्यात येणार आहे हेही मी त्याला सांगितले होते. त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार कळवला, हे सांगणारा रोहित आपल्या ‘कॉप युनिव्हर्स’चा सगळय़ात देखणा पोलीस अशा शब्दांत सिद्धार्थचे कौतुक करतो.
हेही वाचा >>>Video: आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शनला पत्नीसह पोहोचले राज ठाकरे, तर आदित्य ठाकरेंची आई व भावासह हजेरी
धाक तर हवाच..
आपल्या देशात पोलिसांच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. ते नेहमी गुन्हा घडल्यानंतर येतात, पोलीस अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, अशा कितीतरी निर्थक चर्चा सुरू असतात, पण वास्तवात तसे नसते. त्यांचा देखील परिवार आहे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. करोनाकाळात देखील हे पोलीसच होते जे २४ तास रस्त्यावर जीवाचा धोका पत्करून खंबीरपणे आपली जबाबदारी पार पाडत होते. कोणताही सण असो वा उत्सवाचे वातावरण असो त्यांना त्यांच्या डय़ुटीसाठी थांबावेच लागते. पोलीस नेहमी उशिरा येतात याची चर्चा करणाऱ्यांना ते गुन्हेगाराला कसे पकडतात याची काहीच माहिती नसते. ते दाखवण्याचा प्रयत्न माझ्या या कॉप युनिव्हर्सच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न मी करतो आहे, असे रोहितने सांगितले. अर्थात, या चित्रपटांमधून पोलीस कायदा हातात घेतात वा हिंसा करतात असे दाखवले जात असल्याची टीका आपल्यावर केली जाते. मात्र त्यात तथ्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले. समाजात काही प्रमाणात पोलिसांचा धाक असणे गरजेचे आहे, असे आपल्याला वाटत असल्याचे त्याने सांगितले. निरपराध लोकांची हत्या वा लोकांनी कायदा हातात घ्यावा याचा पुरस्कार मी चित्रपटातून केलेला नाही, मात्र गुन्हेगारी वृत्तीची माणसे समोर येतात तेव्हा त्यांना हाताळण्यामागची मानसिकता पूर्णपणे वेगळी असते. एखादा तुमच्यावर गोळी झाडत असेल तर तुम्ही नक्कीच बाहू पसरून त्याचे स्वागत करणार नाही. तुम्हाला त्याचा सामना शस्त्राने वा वेगळय़ा पद्धतीने करावाच लागेल. पोलिसांचे कामच वेगळय़ा पद्धतीचे आहे. ते लक्षात घेऊन मी मांडणी करतो आणि यासाठी माझ्यावर टीका होत असेल तर त्याचा मी विचार करत नाही. कारण मी हे का करतो आहे? यामागचा माझा उद्देश माझ्या डोक्यात स्पष्ट आहे, असेही त्याने ठामपणे सांगितले.