‘कलर्स’च्या ‘खतरों के खिलाडी – फीअर फॅक्टर’ लोकप्रिय झालं ते त्याचा सूत्रसंचालक अभिनेता अक्षय कुमारमुळे. अक्षय आणि अ‍ॅक्शन हे एकच समीकरण होते. सेलिब्रिटींना खरोखर स्टंट्स करायला लावणारा हा शो लोकांनाही आवडला. पण, या शोचे एक पर्व प्रियांका चोप्राने केले होते त्याला मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा एकदा या शोचे पाचवे पर्व आणताना सूत्रसंचलन दिग्दर्शक आणि अ‍ॅक्शनमास्टर रोहित शेट्टीकडे देत नवी खेळी खेळली आहे.
या शोच्या नव्या पर्वात सध्या चर्चेत असलेले अनेक सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. पण, सूत्रसंचालक म्हणून रोहित शेट्टीकडे हे पर्व सोपवण्याची खेळी कितपत योग्य ठरेल, याबद्दल साशंकता असली तरी त्यामुळे लोकोंची शोबद्दल उत्कंठा वाढवण्यात वाहिनीला निश्चितच यश मिळाले आहे. चित्रपटातून गाडय़ा उडवणं, त्यांचे स्फोट करणं, हिरोला चालत्या बाईकवर उभं राहून एंट्री घ्यायला लावणं या सगळ्या अ‍ॅक्शन प्रकारात दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीचा हात कोणी धरू शकत नाही. ‘अ‍ॅक्शन माझ्या रक्तातच आहे’, असं सांगत रोहितने ‘केकेके’चे नवे पर्व हे आपल्या चित्रपटांप्रमाणेच विनोद आणि अ‍ॅक्शनचे अजब रसायन असेल, असे आश्वासन दिले आहे.
‘केकेके’च्या नव्या पर्वात अभिनेता रणवीर शौरी, खलनायकी व्यक्तिरेखांसाठी प्रसिध्द असलेला अभिनेता निकितन धीर, मॉडेल रजनीश दुग्गल, मुग्धा गोडसे यांच्यासह छोटय़ा पडद्यावरती प्रसिध्द असणाऱ्या माही विज, पूजा गौर, ‘सीआयडी’ फेम दया म्हणजेच दयानंद शेट्टी यांचा समावेश आहे. तर ‘बिग बॉस’मुळे प्रसिध्द झालेले प्रेमाचा त्रिकोण गौहर खान, कुशल टंडन आणि एजाझ खान इथेही अ‍ॅक्शनशी सलगी करताना दिसणार आहेत. ‘स्टंट वुमन’ गीता टंडन आणि ‘फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल’ रोशेल मरिया राव ही दोन नावे या स्पर्धकांमध्ये वेगळी आहेत. यावेळी फीअर फॅक्टरचा अ‍ॅक्शन ड्रामा दक्षिण आफ्रिकेत केप टाऊनमध्ये रंगणार असून उन्हाळ्याच्या सुटय़ांमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा