दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी साहित्य संमेलनावरील वादग्रस्त पोस्टनंतर फेसबुक अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे. लाखो लोकांनी कुठेतरी जाऊन गोंधळ घालायच्या या कार्यक्रमांचा पुनर्विचार करता येईल का, असा सवाल त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे उपस्थित केला होता. इतकंच नव्हे तर यवळमाळ कुठे आहे हेच माहीत नाही असंदेखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं होतं. कुंडलकरांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली होती.
साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कुंडलकरांनी फेसबुकवर ही पोस्ट लिहिली होती. महाराष्ट्रात राहून जर तुम्हाला यवतमाळ कुठे आहे हे माहीत नसेल तर शरमेची गोष्ट आहे, अशा अनेक कमेंट्स त्यांच्या या फेसबुक पोस्टनंतर पाहायला मिळाल्या होत्या. या टीकांनंतरच त्यांनी फेसबुक अकाऊंट काही काळासाठी (डिअॅक्टिव्हेट) बंद केल्याचं समजतंय.
काय होती पोस्ट?
मला तर यवतमाळ कुठे आहे हेच माहीत नव्हते. ते आमच्या प्रणव सखदेवने समजावले. कुठल्या तरी अनोळखी जागी जाऊन भयंकर गर्दी करून भाषणे ऐकण्यापेक्षा ज्यांना भेटायचे आहे त्या लेखकांनी आणि कवींनी आपसांत फोन करून पुण्यामुंबईत किंवा चांगल्या निसर्गरम्य जागी जमून छोटी अनौपचारिक गेट-टुगेदर्स केली तर जास्त चांगले होणार नाही का? भरपूर मोकळेपणाने लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसे येऊन गर्दी करायची का गरज आहे? आपल्या पूर्वजांकडे संपर्काची साधने नव्हती. त्यामुळे ती माणसे सारखी सणवार, उत्सव भरवून गर्दी करत. आजच्या काळात तसे करायची गरज उरली आहे का?