अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या घटनेला वर्षपूर्ती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन अयोध्या’ या आगामी चित्रपटातून एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी केला आहे. राम मंदिर झाले, आता पुढे काय? रामाने दिलेल्या विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशा आशयाची मांडणी असलेला हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच पार पडला. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक समीर सुर्वे यांच्याशी साधलेला हा संवाद.
रामराज्याच्या विचारांनी कथेची गुंफण आपल्या देशात हजारो राम मंदिर आहेत, परंतु इतिहास आणि संघर्षामुळे अयोध्येतील राम मंदिर वैशिष्ट्यपूर्ण ठरते. पण अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणानंतर पुढे काय? असा प्रश्न आपसूकच मनात निर्माण झाला. आपण रामराज्याकडे वाटचाल करू शकतो का? अयोध्येतील राम मंदिर ही रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना प्श्रीरामाचा इतिहास सांगायला हवा, या विचारांनी ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाची कथा गुंफली गेली असल्याचे समीर सुर्वे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
अयोध्येतील राम मंदिर परिसरात चित्रीकरण अयोध्येतील मंदिर परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून राममूर्तीचे दर्शन आणि मंदिराची सफर प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवता येणार आहे. अयोध्येत चित्रित होणारा ‘मिशन अयोध्या’ हा भारतातील पहिलाच चित्रपट आहे. कलाकार व तंत्रज्ञांचा संपूर्ण चमू, वीस लहान मुलांना सांभाळणे आणि सर्व साहित्य घेऊन अयोध्येत चित्रीकरण करणे आव्हानात्मक होते. महाराष्ट्रातील वातावरण आणि अयोध्येतील वातावरणात प्रचंड फरक आहे, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि अनोळखी व्यक्ती, अशा सर्व गोष्टींना सामोरे जाऊन चित्रीकरण पूर्ण केले, अशी आठवणही सुर्वे यांनी सांगितली.
नवोदित कलाकारांवर भर कलाकारांची निवड करण्यापूर्वी एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि या कार्यशाळेतून वीस लहान मुलांची निवड केली. त्यानंतर सर्व मुलांना अभिनयाचे प्रशिक्षणही दिले. या सर्व लहान मुलांनी जबरदस्त मेहनत घेतली असून अप्रतिम अभिनय केला आहे, अशी कौतुकाची पावती दिग्दर्शक समीर सुर्वे यांनी दिली. चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी तुलनेने नवोदित व कमी अनुभव असलेल्या कलाकारांची निवड करण्याचे ठरविले होते. प्रसिद्ध कलाकारांना घेऊन काम केले असते, तर चित्रपट पूर्णत्वास गेला नसता. अयोध्येतील रखरखत्या उन्हात आणि कमी वेळेत चित्रीकरण करायचे होते, त्यामुळे या गोष्टींना प्रस्थापित कलाकारांचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले नसते. नवीन कलाकार हा १०० टक्के झोकून देऊन काम करतो, शिवाय प्रस्थापित कलाकारांचे भरमसाट मानधन निर्मात्याला परवडणारे नसते, मी एक निर्माता व दिग्दर्शक असल्यामुळे या गोष्टींची जाणीव आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘मिशन अयोध्या’ चित्रपटात नेमके काय?
रामाची माहिती भविष्यातील पिढ्यांनाही समजणे आवश्यक आहे, या विचारातून ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळली आहे. तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केले आहे. गीतलेखन अभिजीत जोशी, पूर्वा ठोसर आणि समीर सुर्वे यांनी केले असून एस. डी. सद्गुरू यांनी संगीतबद्ध केले आहे. तर नीलेश डहाणूकर यांचे पार्श्वसंगीत आहे. तसेच नीलेश देशपांडे, डॉ. अभय कामत, तेजस्वी पाटील, सतीश पुळेकर, गुरुवेश पंडित, साकार देसाई आदी कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
कोणताही प्रचारपट नाही
‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट कोणताही प्रचारपट नाही वा त्यामागे कुठलाही छुपा हेतू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एका सामान्य शिक्षकाच्या मनात अयोध्येत राम मंदिर बांधून झाल्यानंतर उमटलेल्या प्रश्नांतून, त्याला अस्वस्थ करणाऱ्या विचारांतून या चित्रपटाची कथा जन्माला आली आहे. रामराज्य हे एकाअर्थी आदर्श लोकशाही आणि न्यायाचे राज्य कसे असावे? याचे प्रतीक आहे आणि त्या दृष्टीने रामराज्याचा विचार या चित्रपटात मांडण्यात आला असल्याचे सुर्वे यांनी स्पष्ट केले. या चित्रपटाची निर्मिती करताना ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भही तपासले गेले असल्याचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी स्पष्ट केले.