Maha Kumbh Girl Monalisa director Sanoj Mishra Arrested : प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यातला मोनालिसा नावाची तरूणी चांगलीच व्हायरल झाली होती. या मोनालिसाला दिग्दर्शक सनोज मिश्रा याने चित्रपट देखील ऑफर केला होता. दरम्यान आता सनोज मिश्रा याच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली येथे बलात्काराच्या प्रकरणात मिश्रा याला अटक करण्यात आली आहे. एका छोट्या शहरात राहणाऱ्या तरूणीने त्याच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिला फिल्म स्टार बनवण्याचे अमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप मिश्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित तरूणीने पोलिसांना सांगितले की ती २०२० मध्ये टिकटॉक आणि इंस्ट्राग्रामच्या माध्यमातून सनोज मिश्रा यांच्या संपर्कात आली. तेव्हा ती झासी येथे राहत होती. काही काळानंतर ते नेहमी बोलू लागले आणि १७ जून २०२१ रोजी मिश्रा याने तिला कॉल केला आणि तो झासी रेल्वे स्थानकावर असल्याचा दावा केला. पण या तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिला, तेव्हा मिश्रा याने तू भेटायला आली नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी दिली.
या धमकीला घाबरून पीडित तरूणी त्याला दुसर्या दिवशी भेटण्यास तयार झाली. १८ जून २०२१ रोजी मिश्रा तिला रिसॉर्टवर घेऊन गेला आणि तेथी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने घटनेचा अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तिने विरोध केला तर ते व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली. पीडितेने पुढे असा दावा केला आहे की, लग्नाचे तसेच चित्रपटात भूमिका देण्याचे खोटे आश्वासन देऊन तो वारंवार तिचे शोषण करत राहिला.
महाकुंभमेळा २०२५ मध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर दिल्यानंतर मिश्रा चांगलाच चर्चेत आला होता. कुंभमेळ्यात मोनालिसाच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा झाली होती, तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर तिला चित्रपटाची ऑफर मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसामंतर सनोज मिश्रा याने देखील आगामी चित्रपट द डायरी ऑफ मनीपूर मध्ये मोनालिसाला संधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्याने मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षण देणार असल्याचेही म्हटले होते. सनोज तिला घेऊन काही कार्यक्रमांमध्ये देखील गेला होता.
सनोज मिश्रा याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यामध्ये गांधीगिरी, राम की जन्मभूमी, लफंगे नवाब, धर्म के सौदागर, आणि काशी टू काश्मीर अशा चित्रपटांचा समावेश आहे.