गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. श्रेयश जाधव, रवी फड निर्मित हा चित्रपट श्रेयश जाधव यांनीच दिग्दर्शित केला असून येत्या २०२३ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘डंका हरी नामाचा’ हा चित्रपट केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. सध्या तरी या चित्रपटातील कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत.

दिग्दर्शक श्रेयश जाधव याने मराठी सिनेसृष्टीला ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॅाप’, बाबू बॅन्ड बाजा’, ‘ऑनलाईन बिनलाईन’, ‘मी पण सचिन’ असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले. शिवाय आपल्या हटके मराठी रॅप साँगने तरूणाईलाही भुरळ घातली. पहिला मराठी रॅपर अशी ओळख मिळवणाऱ्या श्रेयशने सिनेसृष्टीला नेहमीच काहीतरी वैविध्यपूर्ण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळेल.

आणखी वाचा- KBC 14: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नासाठी आमिरने वापरली लाइफ लाइन, तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर?

या चित्रपटाबद्दल श्रेयश जाधव म्हणतो, “डंका… हरी नामाचा हा भव्य चित्रपट एक अॅक्शनपट असून त्याला विनोदाची जोड लाभली आहे. आजच्या खास दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून हळूहळू या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. हल्ली प्रादेशिक चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचत आहेत आणि मुळात मराठी चित्रपटांचा आशय हा अत्यंत दर्जेदार असतो. त्यामुळे मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचतील.’’

Story img Loader