गावात रोजगार नाही, शेती करणं सोपं नाही, शहरात-परदेशात शिकून आलेल्या तरुणांना गावात वीज-पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव टोचत राहतो. त्यापेक्षा शहरातल्या दगदगीत स्वत:ला विसरून पैसे मिळवत तथाकथित आधुनिक राहणीमान असलेले आयुष्य त्यांना अधिक सोयीचे वाटते. शहरात जाणारी तरुण पिढी गावात राहून विकासासाठी प्रयत्नशील झाली तर दुर्लक्षित राहिलेल्या गावांच्या आणि पर्यायाने भविष्यातील पिढीच्या दृष्टीनेही शाश्वत विकास साधता येईल. ही वाट सोपी नाही, पण कुठूनतरी सुरुवात व्हायला हवी, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक विनोद माणिकराव यांनी ‘गाव बोलावतो’ या चित्रपटातून केला आहे.
गावाचा विकास हा खूप व्यापक विषय आहे. त्यामागे गावकऱ्यांची मानसिकता, त्यांची इच्छाशक्ती, संबंधित गावातील राजकीय-सामाजिक परिस्थिती आणि आजच्या काळाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या समस्या, विकासाच्या नावाखाली गावकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात गिळंकृत करून कारखाने उभी करणारी एक व्यवस्था, पर्यावरणाच्या समस्या असे खूप मुद्दे आहेत.
इथे फक्त हुशारी उपयोगाची नाही, मुळात गावचा विकास हा कोणा एकाने करून होत नाही. सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून एकमेकां साहाय्य करू अवघे धरू सुपंथ याच वृत्तीने तो साधला जाणार आहे. इथे पुढाकार घेणाऱ्या तरुणांपासून प्रत्यक्ष त्यात सहभाग घेणाऱ्या सगळ्यांच्याच संयमाची, जिद्दीची कसोटी लागते. त्यातून जे तरले ते निश्चितपणे गावचा विकास साधण्यात यशस्वी झाले. या सगळ्या मुद्द्यांची वरवर का होईना एकत्र आणून मोट बांधत विनोद माणिकराव यांनी गावच्या विकासाची गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरी गावाची गोष्ट यात पाहायला मिळते. आप्पा सरपोतदार नागरीचे शेतकरी. त्यांचा मुलगा संग्राम शिकून शहरात स्थायिक झाला आहे. तिथे एक मोठा प्रकल्प त्याने हाती घेतला आहे आणि तो त्याला पूर्ण करायचा आहे. आप्पांना मात्र वाटतं संग्रामसारख्या तरुणांनी गावात राहून इथल्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. संग्राम भविष्याची स्वप्न रंगवत शहरात निघून जातो. आणि इथे गावात फॅक्टरीसाठी आप्पांची जमीन मिळवण्यासाठी सर्जेराव इरेला पेटतो. अखेर आप्पांना मारून सर्जेराव फॅक्टरीचं काम सुरू करण्याच्या बेतात असताना संग्राम गावात परततो. वडिलांचं एकमेव स्वप्न पूर्ण करायचं हा निर्धार करून तो कामाला लागतो. कोणालाही मारून हवं ते ताब्यात घेण्याची मनीषा बाळगणाऱ्या सर्जेरावचा विरोध मोडून काढणं आणि दुसरीकडे गावकऱ्यांना विकासकामांसाठी तयार करणं, गावात रस्ते, पाणी हे सगळं केवळ सरकारी योजनांच्या आधारे येणार नाही त्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान करायला हवं, एकत्र येऊन काम करायला हवं हे त्यांच्या गळी उतरवून त्यांना प्रत्यक्ष कामात सहभागी करून घेणं हेही संग्रामसमोरचं मोठं आव्हान आहे. हे करत असताना सुरुवातीला गावकऱ्यांची उदासीनता पाहून संग्राम निराश होतो, अस्वस्थ होतो. अखेर त्यालाही साथ देणारी मंडळी गावात असल्याने हे आव्हान काहीसं सुकर होतं. अर्थात, गावाच्या विकासासाठी संग्रामने केलेले प्रयत्न, जिल्हा परिषद-महापालिका सगळीकडे खेटे घालत योजना, निधी यांची सांगड घालणं, परवानग्या मिळवणं हा सगळा मुख्य गाभा काही मिनिटांत आपल्या डोळ्यांसमोरून सरकतो. त्याउलट, सर्जेरावची अरेरावी, संग्रामला मारण्यासाठीचे त्याचे प्रयत्न, जोडीला प्रेमकथा, संग्रामचा वैयक्तिक संघर्ष या सगळ्या इतर पसाऱ्यात अधिक वेळ खर्ची गेला आहे.
विनोद माणिकराव यांनी याआधी अनेक चांगल्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शकीय तंत्रात सफाई दिसून येते, मात्र मालिकांसाठी ज्या पद्धतीची नाट्यमय मांडणी लागते त्याचा प्रभाव ‘गाव बोलावतो’च्या मांडणीवरही दिसून येतो. त्यामुळे आजच्या काळाच्या दृष्टीने विषय महत्त्वाचा असूनही सर्जेरावसारखा एखादा राजकारणी किंवा तथाकथित स्थानिक वजनदार नेता, त्याची कटकारस्थानं, त्यांना दबून असणारे गावकरी, कोणाचीही सहज हत्या घडवणं, आपल्या वडिलांची हत्या सर्जेरावने केली आहे हे माहिती असूनही संग्रामने माफीचं तंत्र अवलंबणं, सर्जेरावात एका क्षणी झालेला बदल असे काही ठरावीक ठोकताळे मांडून चित्रपटाची पटकथा लिहिली गेली आहे. त्यामुळे त्या कथेत काही नावीन्य नाही, संग्रामसारख्या हुशार आणि संयमी, ध्येयवेड्या तरुणांनी द्रष्टेपणाने गावच्या विकासासाठी केलेला विचार, आपला अभ्यास – उपलब्ध तंत्रज्ञान याची सांगड घालून केलेले प्रयत्न, त्यात येणारे अडथळे, कधी ते नैसर्गिक असतील वा कधी सरकारी-प्रशासकीय पातळीवरचे असतील त्याविषयीची सारासार मांडणी यावर भर दिला असता तर काही वेगळे आणि प्रेरणादायी निश्चितच हाती लागले असते. अशा पद्धतीने गावचा विकास करणाऱ्यांची प्रत्यक्ष उदाहरणंही आजूबाजूला आहेत आणि याची झलक खुद्द दिग्दर्शकाने चित्रपट संपता संपता दाखवून दिली आहे. त्याबद्दल निर्माते – दिग्दर्शक यांचं कौतुक करायला हवं. इतका चांगला विषय मांडण्यासाठी भूषण प्रधान, माधव अभ्यंकर अशा चांगल्या कलाकार मंडळींचीही साथ दिग्दर्शकाला लाभली आहे. गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ध्येयवेड्या तरुणाच्या भूमिकेसाठी अभिनेता भूषण प्रधानची निवड सार्थ ठरली आहे. त्याच्याबरोबरचे सहकारी, पत्रकार अशा छोट्या-छोट्या भूमिकांमधील कलाकारही उल्लेखनीय आहेत. मात्र, उत्तम विषय असूनही त्याच त्याच पद्धतीची सोपी मांडणी करायचा मोह आवरता आला असता तर ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता.
गाव बोलावतो
दिग्दर्शक – विनोद माणिकराव
कलाकार – भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे, शुभांगी लाटकर, श्रीकांत यादव.