मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (२२ जुलै) करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली. याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या कलाकारांचे अभिनंदन केले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील याबाबत ट्विट केलं.
‘द कश्मीर फाईल्स’ फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक ट्विट करत राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या कलाकारांचे अभिनंदन केलं. पण त्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीबाबत एक मोठं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर अधिक चर्चा रंगत आहे. इतकंच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं त्यांनी कौतुक केलं.
ट्विटद्वारे विवेक अग्निहोत्री म्हणाले, “अजय देवगण, सूरारई पोटरु, सूर्या आणि अपर्णा बालमुरली, सुधा कोंगरा तसेच इतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे यांचे मनापासून अभिनंदन. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि इतर प्रादेशिक चित्रपटांसाठी हा दिवस मोठा आहे. पण हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक मेहनत करण्याची गरज आहे.”
आणखी वाचा – Photos : रणवीर सिंग पाठोपाठ न्यूड लूकमधील बॉलिवूड अभिनेत्यांचे फोटो ठरताहेत चर्चेचा विषय
त्यांचं हेच ट्वीट सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अभिनेता अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटाने बाजी मारली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला. तर याच चित्रपटासाठी अजय देवगणलाही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘तुलसीदास ज्युनिअर’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याशिवाय ‘सायना’ चित्रपटासाठी गीतकार मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार देण्यात आला.