Directors Khalid Rahman, Ashraf Hamza Arrested : काही दिवसांपूर्वी केरळचा प्रसिद्ध मल्याळम अभिनेता शाइन टॉम चाकोला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. केरळच्या एर्नाकुमल टाउनचे नॉर्थ पोलीस स्टेशनमध्ये चार तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. १६ एप्रिलला रात्री उशीरा कोचीच्या एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी शाइन तिथून पळ काढताना दिसला होता. त्यामुळे पोलीस शाइनच्या शोधात होती. पोलिसांनी २३ एप्रिलला सकाळी १० वाजता त्याला समन्स बजावला आणि चार तासांच्या चौकशीनंतर शाइनवर कारवाई केली होती. हे प्रकरण ताज असतानाच दोन प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शकांना ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याचं समोर आलं आहे.

केरळ पोलिसांच्या उत्पादन शुल्क विभागाने २७ एप्रिलला पहाटे छापा टाकला आणि प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक खालिद रहमान ( Khalid Rahman ), अशरफ हमजा ( Ashraf Hamza ) यांच्यासह आणखी एका व्यक्तीला कोची येथील त्यांच्या फ्लॅटमधून अटक केली. यावेळी त्यांच्या फ्लॅटमधून हायब्रिड गांजा ( Hybrid Ganja ) जप्त करण्यात आला. याबाबत अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती आणि त्याआधारे त्यांनी कारवाई केली.

‘मनोरमा ऑनलाइन’च्या वृत्तानुसार, एका माहितीच्या आधारे, उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी २७ एप्रिलला पहाटे २ वाजता कोची येथील फ्लॅटवर छापा टाकला होता. यावेळी तिघांकडून १.६ ग्रॅम हायब्रिड गांजा जप्त केला. तिसऱ्या व्यक्तीची ओळख शालिफ मोहम्मद असून, तो दिग्दर्शकांच्या जवळचा मित्र आहे. ज्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला तो सिनेमॅटोग्राफर समीर ताहिर यांनी भाड्यानं घेतल्याचं म्हटलं जात आहे.

छाप्यानंतर एका अधिकाऱ्याने ‘मनोरमा ऑनलाइन’शी संवाद साधताना सांगितलं की, आम्ही कोची येथील एका फ्लॅटमधून तिघांना ताब्यात घेतलं असून तिथून हायब्रिड गांजा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ च्या कलम २० (ब) (II) ए आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही त्यांना कोची येथील पूर्वा ग्रँडबे येथील फ्लॅट ५०६ येथून पकडले. आम्ही फ्लॅटवर छापा टाकला तेव्हा ते गांजाचं सेवन करण्याच्या तयारीत होते. त्यांची चौकशी केल्यानंतर, आम्हाला समजलं की, हे तिघेही बरेच दिवसांपासून गांजाचं सेवन करत आहेत. फ्लॅट कोणाचा आहे याची आम्हाला अद्याप खात्री झालेली नाही.”