बॉलीवूडमध्ये मसालापट हा मुख्य प्रवाहातील पठडीबद्ध गल्लाभरू सिनेमाचा प्रवाह अजूनही कायम आहे. भडक रंग, भडक नाटय़, भडक गाणी, भडक संगीत अशा सगळ्या भडकचा भडिमार करणे. सबरस प्रेक्षकांसमोर आणून सुरुवातीपासून शेवटापर्यंत प्रेक्षकाला खिळवून कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करणारा सर्व काही अतिरंजित दाखविण्याचा ‘कसोशीने’ प्रयत्न करणारा खोटा सिनेमा पुन्हा पुन्हा प्रेक्षकांसमोर येतो. ‘स्टार कलावंत’ ही या सिनेमांची जमेची बाजू असते. त्यापैकीच ‘डर्टी पॉलिटिक्स’ हा के. सी. बोकाडिया लिखित-दिग्दर्शित सिनेमा आहे. या सिनेमातही ओम पुरी, गोविंद नामदेव, नसरूद्दीन शाह, अनुपम खेर, अतुल कुलकर्णी अशी उत्तम कलावंतांची फळी असून हीच या सिनेमाची जमेची बाजू ठरली आहे.
अनोखी देवी म्हणजे मल्लिका शेरावत ही राजस्थानातील एक नर्तकी आहे. अंगप्रदर्शन करून नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना रिझविणे हा तिचा व्यवसाय आहे म्हणे. तिला पाहून दीनानाथ नावाचा राजकारणी भाळतो. निवडणुका तोंडावर असूनही अनोखी देवीला मिळविण्यासाठी तो तिला राजकारणात येण्याचे आमंत्रण देतो, सोयीसुविधा देऊन तिला आपल्या पक्षातर्फे तिकीट देण्याचे ठरवितो. पैसा-प्रसिद्धी-राजकारणातील मानमरातब, जनतेसमोर राजकीय व्यक्ती म्हणून मिळणारी प्रतिष्ठा याची चटक तिला लागते. पक्षातर्फे अमुक एका मतदारसंघातून तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा मात्र दीनानाथ हा राजकारणी गुंड प्रवृत्तीच्या मुख्त्यार खानला तिकीट देतो. त्यावरून अनोखी देवी भडकते. याचा वचपा काढण्यासाठी ती दीनानाथला एका सीडीच्या आधारे ब्लॅकमेल करते आणि एक नाटय़ घडते.
अनोखी देवीच्या भूमिकेतील मल्लिका शेरावतने आपल्या नेहमीच्या स्टाइलने अभिनय केला आहे. पडद्यावरील तिच्या प्रतिमेला धक्का न लावता दिग्दर्शकाने तिची भूमिका बेतली आहे. मुळात एका नर्तकीला राजकारणी बनण्याची स्वप्ने पडूच कशी शकतात वगैरे फालतू प्रश्न प्रेक्षकांनी मनात आणू नयेत अशी आणि एवढीच माफक अपेक्षा दिग्दर्शकाची आहे. राजकारणी बहुतांशी खलनायकी असतातच असा एक समज प्रेक्षकांचा आणि मोठय़ा प्रमाणावर जनतेचा झाला आहे याला हल्लीचे आणि जुने सर्वच राजकारणी जबाबदार आहेत हे खरे मानले तरी प्रेक्षकांचा हा समज आपल्या अतिरंजित सिनेमाद्वारे अधिक कायम करण्याचा विडाच जणू दिग्दर्शकाने उचलला आहे हे हा सिनेमा पाहताना जाणवते. राजकारणी असेच असतात हा सार्वत्रिक समज खरा मानला तरीसुद्धा राजकारण्यांचे अति बटबटीत चित्रण १९८० च्या दशकासारखे आत्ता करण्यात हशील काय, हा प्रश्न चित्रपटकर्त्यांच्या मनाला शिवलेलासुद्धा नाही याचे काय करावे?
दीनानाथ ही राजकारण्याची प्रमुख भूमिका ओम पुरीने साकारली असून सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत अनुपम खेर तर राजकारण्यांच्या विरोधातील भूमिका नसरूद्दीन शाह यांनी साकारली आहे. खलनायक जॅकी श्रॉफ आहे तर गोविंद नामदेव भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे. आशुतोष राणा दलाली करणारा राजकारणी आहे. वास्तवातही राजस्थान महिलांवरील अन्यायाची प्रकरणे अतिशय संशयास्पद पद्धतीने हाताळली गेली आहेत एवढे एकच सत्य या सिनेमाचा आधार आहे. आजच्या काळात १९८०-८२ च्या दशकातील हिंदी चित्रपटाची मांडणी, बटबटीतपणा पुन्हा दाखवून खोटा सिनेमा पुन्हा पुन्हा बनवायचा आणि प्रेक्षकांवर लादायचा असा प्रकार गल्लापेटीच्या हव्यासापोटी करण्याचा वरचेवर प्रयत्न होणारच आहे. या सिनेमाच्या कथानकापासून मांडणीपर्यंत कोणतेही नावीन्य नाही. परंतु अतिरंजित करमणुकीचा उत्तम नमुना असल्यामुळे चित्रपट काही अंशी खिळवून ठेवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डर्टी पॉलिटिक्स
निर्माते – निहाल फरहात
लेखक-दिग्दर्शक – के. सी. बोकाडिया
संगीत – आदेश श्रीवास्तव, रॉबी बादल, संजीव दर्शन.
कलावंत – मल्लिका शेरावत, ओम पुरी, आशुतोष राणा, नसरुद्दीन शाह, राजपाल यादव, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, सुशांत सिंग, अतुल कुलकर्णी, गोविंद नामदेव, राहुल सोलंकी व अन्य.

डर्टी पॉलिटिक्स
निर्माते – निहाल फरहात
लेखक-दिग्दर्शक – के. सी. बोकाडिया
संगीत – आदेश श्रीवास्तव, रॉबी बादल, संजीव दर्शन.
कलावंत – मल्लिका शेरावत, ओम पुरी, आशुतोष राणा, नसरुद्दीन शाह, राजपाल यादव, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, सुशांत सिंग, अतुल कुलकर्णी, गोविंद नामदेव, राहुल सोलंकी व अन्य.