‘रॉक द शादी’ हा आपला चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने अभिनेता अभय देओल अतिशय दु:खी झाला आहे. तरी त्याने आशा सोडलेली नसून, एक ना एक दिवस हा चित्रपट प्रदर्शित होईल, असे त्याला वाटत आहे. अभय देओल आणि जनेलिया डिसुझाचा ‘रॉक द शादी’ हा चित्रपट भारतातील पहिला झोंबी विनोदी चित्रपट म्हणून संबोधला जात होता, ज्याचे दिग्दर्शन नवदीप सिंगने केले आहे. या विषयी बोलताना अभिषेक म्हणाला, मी आणि नवदीपने या चित्रपटासाठी अनेक महिने परिश्रमपूर्वक उत्साहाने काम केले होते. आता जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित होत नसल्याचे समजले, तेव्हा मनाला अतिशय वेदना होत आहेत. या विषयी अनेक वावड्या उठत असल्या तरी यात दिग्दर्शकाचा काही दोष नाही. या चित्रपटाची सध्या काय स्थिती आहे या विषयी मला काहीही माहिती नाही. यात काही कायदेशीर बाबी गुंतलेल्या आहेत अथवा नाही, याबाबत देखील मला काही माहीत नाही. हा एक उत्तम चित्रपट असून, मी केलेल्या चित्रपटापैकी हा सर्वात विनोदी चित्रपट असल्याचे देखील तो म्हणाला. एकता कपूर पुन्हा या चित्रपटाकडे लक्ष देईल याची अभयला आशा आहे. तो म्हणाला, मी एकता कपूरला अनेक वर्षांपासून ओळखतो. ती खूप चांगली आहे. माझा हा तिच्याबरोबरचा पहिलाच चित्रपट होता. जे काही घडलं ते अतिशय दुखद आहे. असे असले तरी, मला अजून आशा आहे की, पुन्हा एकदा एकता कपूर या चित्रपटाकडे लक्ष देईल. जे ती करू शकते, असे मला वाटते. ‘बातों बातों में’ या चित्रपटाचा अभय रिमेक करत असल्याचे वृत्त देखील माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. या विषयी बोलताना अभय म्हणाला, मी या चित्रपटाविषयी ऐकलेले नाही. मी हा चित्रपट करत असल्याचे वृत्तपत्रातूनच वाचले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा