आपण काळाला मागे नेऊ शकत नाही, मात्र भविष्य निश्चित सुधारू शकतो’, हा विचार समोर ठेवत जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने डिस्कव्हरी वाहिनीने अभिनव मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्यांशी झगडणाऱ्या पृथ्वीचे पर्यावरण संतुलन दिवसेंदिवस ढासळते आहे. वेळीच या समस्यांची लोकांना जाणीव करून देण्याच्या दृष्टीने डिस्कव्हरी वाहिनीने ‘हॅशटॅग स्टॉप द मेल्ट’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वाहिनीने आपल्या लोगोतही बदल के ला आहे. या बदलत्या लोगोच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे वाहिनीने स्पष्ट के ले आहे.
‘यूएन इंडिया’ आणि ‘डब्ल्यूडब्ल्यू इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने डिस्कव्हरी वाहिनीने हा उपक्रम हाती घेतला आहे. डिस्कव्हरी वाहिनीच्या वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरूनही पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगचे जगभर होणारे परिणाम, त्यामुळे वातावरणात झालेले हानिकारक बदल या सगळ्या घटनांचे व्हिडीओ, त्यासंदर्भातील माहिती या समाजमाध्यमांवरूनही देण्यात येणार आहे. ही मोहीम सर्वदूर नेण्यासाठी तारांकितांचीही मदत वाहिनीला होणार आहे. समाजमाध्यमांवर प्रभाव असणारे मलाईका अरोरा, सुरेश रैना, राणा डुग्गुबाती, मनोज वाजपेयी, दिया मिर्झा, प्रतीक गांधी, दिग्दर्शक नीरज पांडे, निर्माता शीतल भाटिया, सानिया मिर्झा आणि जगभरात पर्यावरण विषयी काम करणारे अभ्यासक यांसारख्या तारांकितांनी वाहिनीला या कार्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. पर्यावरणाचे पुनरुज्जीवन ही संकल्पना यंदाच्या यूएन जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत अधिकाधिक वृक्षारोपण, प्लास्टिक वापरावर पूर्ण बंदी किं वा कमीतकमी वापर, त्याचा पुनर्वापर अशा छोट्या छोट्या कृतीतून प्रत्यक्षपणे पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत राहण्याच्या सवयी आपण आपल्याला लावून घेऊ शकतो. याची जाणीव लोकांना करून देणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असेल, असे वाहिनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट के ले आहे. भविष्यात पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर आजच कृती करणे गरजेचे आहे हा विचार या उपक्रमांतर्गत आपल्या लोगोपासून कार्यक्रमांपर्यंत सगळ्यातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वाहिनीचा मानस आहे.