शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंची मैत्रीण व अभिनेत्री दिशा पटानीने सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा आदित्य ठाकरे. असाचं चमकत राहा आणि शानदार प्रगती कर’, असं दिशाने ट्विट केलंय. आदित्य ठाकरे यांचं नाव अनेकदा दिशासोबत जोडलं गेलं आहे. हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून अनेकदा त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुलाखतींमध्येही अनेकदा या दोघांना एकमेकांविषयी प्रश्न विचारले गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत दिशाने आदित्य ठाकरेंच्या मंत्रीपदावर प्रतिक्रिया दिली होती. “आदित्य माझा चांगला मित्र आहे आणि त्याच्या कामावर मला खूप विश्वास आहे. सध्या देशाला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि आदित्यसारखा तरुण नेता महाराष्ट्राला मिळाला ही खूपच चांगली गोष्टी आहे”, असं ती म्हणाली होती. आदित्य यांच्या कामाची स्तुती करत ती पुढे म्हणाली, “ते पर्यावरण संवर्धनासाठी बरंच काही करत आहेत. खास करून जंगल वाचवण्यासाठी त्यांनी चांगले पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्र सुरक्षित हातात आहे. त्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला चालना दिली आहे. आता तुम्ही रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरु शकता, सिनेमा पाहू शकता. नाइट लाइफच्या संकल्पनेवर त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे.”
Happiest b’day @AUThackeray stay the amazing you and keep shining
— Disha Patani (@DishPatani) June 13, 2020
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देशात आणि राज्यात असलेल्या करोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच शिवसैनिकांनी असतील त्या ठिकाणाहूनच शुभेच्छा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. दरवर्षी आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसैनिकांना पत्र लिहित आवाहन केलं आहे.