छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिशा वकानीची गच्छंती झाली आहे. दयाबेनच्या भूमिकेसाठी आता निर्माते नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. सप्टेंबर २०१७ पासून दिशा सुट्टीवर आहे. प्रसूती रजेनंतर ती मालिकेत परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मालिकेच्या निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसु्द्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने अखेर दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडीशन सुरू करणार असल्याची माहिती निर्माते असित कुमार मोदी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत असित म्हणाले, ‘प्रसूती रजेनंतर अनेक महिला कामावर परत येतात. दिशाला आम्ही सुट्टी दिली आणि आता तिच्यासाठी आम्ही आणखी वाट पाहू शकत नाही. त्यामुळे आता आम्हाला नव्या दयाबेनचा शोध सुरू करावा लागणार आहे. प्रेक्षक दयाच्या परत येण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांना आम्ही आणखी फसवू इच्छित नाही.’

याआधी दिशाने परतण्यासाठी मालिकेच्या निर्मात्यांपुढे काही अटी ठेवल्याची चर्चा होती. यातली पहिली अट म्हणजे, मानधनातील वाढ. मानधनासोबतच दिशाने काम करण्याच्या वेळेतही बदल करण्याची मागणी केली होती. दिशाची फॅन फॉलोइंग आणि लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहिली. पण यापुढे मालिकेच्या कथानकाची गरज पाहता दिशासाठी आणखी थांबणं योग्य नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha vakani to be replaced in taarak mehta ka ooltah chashmah makers start hunt for new dayaben