बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिम, वरुण धवन आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांचा बहुप्रतिक्षीत ‘ढिशूम’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, चित्रपटात जॉन आणि वरुण पोलीस अधिकाऱयांच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे, ट्रेलरच्या सुरूवातीला दाखविण्यात आलेले क्रिकेटपटूचे पात्र हे भारतीय संघाचा सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहलीशी मिळतेजुळते असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.
भारतीय संघाच्या स्टार खेळाडूचे अपहरण नाट्य व त्याची सुटका करण्यासाठी अपहरणकर्त्यांचा माग काढत असलेले जॉन आणि वरुण असे एकंदर चित्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येते. तर जॅकलीनची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे. चित्रपटात ‘विराज’ नावाचा भारतीय संघाचा स्टार खेळाडू दाखविण्यात आला असून भारत-पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या क्रिकेट सामन्याआधी त्याचे अपहरण होते. मग विराजला शोधून काढण्यासाठीचे द्वंद्व आणि ठिकठिकाणी या प्रकरणाला मिळणारी रोमांचक वळणांनी चित्रपटाचा ट्रेलर उत्कंठा वाढवणारा आहे. ट्रेलरच्या शेवटची अभिनेता अक्षय खन्नाचीही दमदार एण्ट्री दाखविण्यात आली आहे.
दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचा भाऊ रोहित धवनने केले असून हा चित्रपट २९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ-