बॉलिवूडमध्ये दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीला एक अशी अभिनेत्री म्हणून लक्षात ठेवले जाते की जिने ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि अदांनी सर्वांनाच घायाळ केले होते. अभिनेत्री दिव्या भारतीचे वडील ओम प्रकाश भारती यांचे निधन झाले आहे. नुकतंच त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे दिव्याच्या वडिलांसोबत शेवटच्या क्षणापर्यंत होते, असं बोललं जात आहे.
दिव्या भारतीच्या वडिलांचे निधन शनिवारी ३० ऑक्टोबर २०२१ रोजी झाले. त्यांच्या निधनाची माहिती आता समोर आली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला यांची दुसरी पत्नी वर्दा खान नाडियाडवाला हिने यांसदर्भातील पोस्ट शेअर केली आहे.
‘बॉलीवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, दिव्या भारतीने प्रसिद्ध चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालासोबत लग्न केले होते. मात्र तिच्या मृत्यूनंतर साजिद नाडियाडवाला हा दिव्याच्या वडिलांची काळजी घ्यायचा. साजिद नाडियाडवालाने दिव्याच्या आई-वडिलांना नेहमीच आपले आई-वडील मानले आहे. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर साजिदने तिच्या आई-वडिलांची पूर्ण काळजी घेतली होती. दिव्या भारतीने तिच्या मृत्यूच्या काही दिवस आधी साजिद नाडियाडवालाशी लग्न केले होते. दिव्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारालाही साजिद उपस्थित होता. साजिद त्यांना आई आणि बाबा म्हणूनच हाक मारायचा.
‘शोला और शबनम’ या सिनेमाच्या सेटवर फिल्ममेकर साजिद नाडियाडवाला गोविंदाला भेटायला गेले होते. तेव्हा त्यांची ओळख दिव्या भारतीशी झाली. त्यानंतर दिव्या १९९२ मध्ये साजिद नाडियाडवालासोबत विवाह बंधनात अडकली. तेव्हा दिव्या भारती केवळ १८ वर्षांची होती. पण लग्नाच्या केवळ एक वर्षांनंतर ५ एप्रिल १९९३ मध्ये दिव्याचा राहत्या घराच्या पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यु झाला. दिव्याच्या मृत्यूनंतर तिचे ‘रंग’ आणि ‘शतरंज’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. ‘रंग’ हा सिनेमा तेव्हाच्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमा ठरला होता.