बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. आज ती आपल्यात नाही. हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्याची जागा इंडस्ट्रीत कोणीच घेऊ शकत नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पण, तिची बहीणही सौर्दंयाच्याबाबतीत तिच्यापेक्षा कमी नाही. दिव्याच्या बहिणीचे नाव आहे कायनात अरोरा.

कायनातने २०१० मध्ये अक्षय कुमारसोबत ‘खट्टा मिठा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा सहारनपूर ते मुंबई हा प्रवाससुद्धा रंजक आहे. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’मध्ये शिक्षण घेत असताना तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘मिस केरला’ स्पर्धेदरम्यान दिग्दर्शक प्रियदर्शनने तिला हेरले आणि त्याने तिला ‘खट्टा मिठा’मध्ये आयटम साँग करण्याची संधी दिली.

आणखी वाचा : दारुच्या व्यसनाबाबत श्रुती हासनचा खुलासा 

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणारी कायनात ही दिव्याची चुलत बहीण आहे. दिव्याप्रमाणे तिला प्रसिद्धी मिळाली नसली तरी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यात ती यशस्वी ठरली आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाच्या ऑडिशनला तिने २०० स्पर्धकांवर मात केली. त्यानंतर तिला विवेक ओबेरॉयसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याचसोबत तिने गिप्पी गरेवाल याच्यासोबत ‘फरार’ या पंजाबी चित्रपटातही आपले नशीब आजमवले. तिने बऱ्याच तमीळ चित्रपटांमध्येही काम केलेय. २०११ मध्ये आलेल्या ‘मनकथा’ आणि रामगोपाल वर्माच्या ‘सीक्रेट’ या चित्रपटांमध्ये ती झळकली होती.

दिल्लीमध्ये ‘एनएफआयटी’मध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या कायनातने ‘कॅडबरी’, ‘मारुती’ या ब्रॅण्डसह ‘लक्स’च्या जाहिरातींमध्ये काम केले. मॉडेलिंग वर्ल्डमधून बॉलिवूडमध्ये आलेली कायनात अरोरा सध्या अभिनयापासून दूर आहे. ‘फरार’ (२०१५) हा तिचा अखेरचा चित्रपट होता.