स्टार प्लसवरील ‘ये है मोहब्बते’ या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हे नाव आज सर्व परिचित झालं आहे. दिव्यांका बऱ्याच वेळा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. या माध्यमातून ती तिचं मत व्यक्त करताना दिसते. विशेष म्हणजे दिव्यांका अनेकवेळा सामाजिक मुद्द्यांवरही तिचं मत मांडत असते. यावेळीदेखील दिव्यांकाने अशाच एका सामाजिक मुद्द्याला हात घातला असून तिने रस्त्यावरील खड्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

दिव्यांकाने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईतील रस्त्यांवर असलेल्या खड्यांवर भाष्य केलं आहे. ‘मुंबईच्या रस्त्यावरुन रोज असंख्य नागरिक प्रवास करत असतात. मात्र येथील रस्त्यांची अवस्था पाहता हे नागरिक कसा काय प्रवास करतात असा प्रश्न पडतो. येथे रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याचं दिसून येतं. माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे. या मार्गावरुन एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने नक्कीच जावं. तेव्हाच त्याला येथील अडचण लक्षात येईल. निदान ही दुरावस्था पाहिल्यानंतर हे रस्ते नीट करण्याचे आदेश तरी ते देतील’, असं ट्विट दिव्यांकाने केलं आहे.

पुढे ती असंही म्हणाली, ‘देशातील प्रत्येक व्यक्ती आयकर भरत असतो. मग त्याच्यासाठी चांगल्या सोयीसुविधा मिळणं हा त्याचा अधिकार आहे’. दिव्यांकाचं हे ट्विट पाहता तिला या रस्त्यावर प्रचंड त्रास झाल्याचं दिसून येत आहे. सध्या दिव्यांका तिच्या आगामी वेबसीरिजमध्ये व्यस्त असून या सीरिजमध्ये ती एका शेफच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत.

 

Story img Loader